गाव पाणीदार झाल्याचे सर्वाधिक समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 08:48 PM2018-08-13T20:48:34+5:302018-08-13T20:49:00+5:30
राज्यस्तरीय वॉटर कप स्पर्धेत तयारीनिशी उतरलो, पण पारोळा तालुकास्तरावर समाधान, नाला खोलीकरणामुळे विहिरी भरल्या
पारोळा, जि.जळगाव : पहिल्यादा चोरवड गावातील सारे जण श्रमदानासाठी अहोरात्र एकत्र आले. गावाला सत्यमेव जयते वॉटरकप स्पर्धेत राजस्तरीय बक्षीस मिळवायचे या जिद्दीने उतरले पण बक्षीस तालुकास्तरीय मिळाले, तरी सर्व ग्रामस्थ खुश आहेत. कारण गाव यामुळे ‘पाणीदार तर झाले,’ अशी माहिती चोरवड, ता.पारोळा येथील ग्र्रामस्थ तथा जि.प.सदस्य डॉ.हर्षल माने यांनी पारोळा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पारोळा तालुक्यातून वॉटर कप स्पर्धेत तालुका स्तरावर १५ लाखांचे बक्षीस मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करताना डॉ.माने यांनी ही माहिती दिली. गावात यासाठी १९ ग्रामसभा घेतल्या. त्यात मनसंधारण केले. मग श्रमदानातून जलसंधारणाची कामे कशी करतात याचा व्हिडीओ पडद्यावर दाखविला आणि गावकऱ्यांचे मन याकडे वळविले. २८ गुण यासाठी लागतात म्हणून पहिल्या दिवसापासून ग्रामस्थांनी स्पर्धेसाठी श्रम घेतले. नर्सरी निर्माण केली. शोषखड्डे तयार केले. गावातील सर्व सांडपाणी त्यात जिरविले. निर्माण केलेल्या नर्सरीत ८ ते १० हजार रोपे तयार केली. गाव आगपेटी मुक्त केले. गावातील वा शेत शिवारातील कचरा जाळायचा नाही, तो शेतात खड्डे करून पुरायचा, अशी संकल्पना राबविली.
८ एप्रिल रोजी गावातून ७०० पुरुष, ८०० महिला एकत्र येऊन मशाली घेऊन बैलगाडी व ट्रॅक्टरमधून गेले. श्रमदानातून नाला खोलीकरण व इतर जलसंधारणाची कामे केली असल्याची माहिती डॉ.हर्षल माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी ग्रामस्थांना प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी यासाठी खासदार ए. टी. पाटील, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार वंदना खरमाळे यांनीही रात्री १२ वाजता चोरवड गावी श्रमदान केले होते.
चोरवड ग्रामस्थांच्या ४५ दिवसांच्या अथक परिश्रमातून हे काम उभे राहिल्याची माहिती त्यांनी दिली. पारोळा तालुक्यात पाणी फाउंडेशनप्रमुख अमीर खान व किरण राव आले. त्यांना चोरवड गावी येण्यासाठी आम्ही आग्रह धरला, पण ते आले नाही. आम्ही सर्व जण नाराज होत नैराश्य आले. नैराश्याने आणि रागाने काही ग्रामस्थांनी या स्पर्धेतून बाहेर पडण्याबाबत बोलू लागले. पण सर्वांची समजूत काढली आणि अमीर खान याना गावाचे बक्षीस मिळवूनच बक्षीस घेताना भेटू, असा चंग बांधला आणि पुन्हा जोमाने जोरदारपणे प्रयत्न केला आणि गावाचा तालुक्यात पहिला नंबर आला. राज्यात नंबर आला नाही, याची खंत नाही, पण गाव गावकºयांच्या अथक परिश्रमातून गाव पाणीदार झाले याचे भूषण मात्र सर्वांना आहे, असे डॉ.माने यांनी या वेळी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले.
या वेळी म्हलार कुंभार, अॅड. भूषण माने, संदेश माने, रोहिदास नगराज पाटील, महेंद्र नितीन पाटील, राजेंद्र पाटील, भालेराव पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते