नोकरदार प्रवाशांसाठी दोन स्वतंत्र बोगी जाेडून प्रवासाची समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:16 AM2020-12-22T04:16:05+5:302020-12-22T04:16:05+5:30
जळगाव : रेल्वेने दररोज अप-डाउन करणार्या नोकरदार प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दोन स्वतंत्र बोगी जोडून त्यांची प्रवासाची समस्या सोडवावी, अशी ...
जळगाव : रेल्वेने दररोज अप-डाउन करणार्या नोकरदार प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने दोन स्वतंत्र बोगी जोडून त्यांची प्रवासाची समस्या सोडवावी, अशी मागणी मध्य रेल्वे उपभोगकर्ता परामर्श समितीचे सदस्य चंद्रकांत (संदीप) कासार यांनी केली आहे.
समिती सदस्यांची बैठक नुकतीच मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेक गुप्ता यांच्यासोबत झाली. प्रवाशांच्या विविध समस्यांवर, मागण्यांवर यावेळी चर्चा झाली. चंद्रकांत (संदीप) कासार यांनी अप-डाउन करणार्या प्रवाशांसाठी एक्स्प्रेस व मेल गाड्यांना स्वतंत्र दोन बोगी लावण्यात याव्यात, अशी मागणी केली. या प्रवाशांना जनरल बोगीत जागा मिळत नाही, आरक्षित बोगीत प्रवास केल्यास दंड होण्याची भीती असते. त्यामुळे या प्रवाशांनी जायचे कुठे, प्रवास कसा करायचा ? असा प्रश्नही कासार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारी उधना-पाळधी मेमू ही गाडी भुसावळपर्यंत वाढवावी. सद्य:स्थितीत अनेक प्रवाशांना पाळधीला उतरून जळगाव, भुसावळपर्यंत ऑटोरिक्षा व बसने प्रवास करावा लागतो. या गाडीचा मार्ग वाढविल्यास या प्रवाशांची समस्या सुटून रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल याकडेही चंद्रकांत ( संदीप) कासार यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.