काही विरोधी सदस्यांचा होता सभात्याग करण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:17 AM2021-04-21T04:17:23+5:302021-04-21T04:17:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून विरोधी पक्षाच्या गटनेत्यांसह सदस्यांनी सभात्याग केला. मात्र, याला काही विरोधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतून विरोधी पक्षाच्या गटनेत्यांसह सदस्यांनी सभात्याग केला. मात्र, याला काही विरोधी सदस्यांचाच विरोध होता, मात्र, गटनेत्यांमुळे त्यांना बाहेर पडावे लागले, असे खुद्द या विरोधी पक्षाच्या काही सदस्यांनी आपल्याला फोन करून सांगितल्याची माहिती अध्यक्षा रंजना पाटील यांनी दिली आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या गटनेत्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकल्याची भूमिका सोमवारी घेतली होती. दरम्यान, यातील काही सदस्यांनी गटनेत्यांच्या या भूमिकेवर आक्षेप घेतला असून गटनेते हे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अशी भूमिका घेत आहेत. आमची सभेतून बाहेर पडण्याची इच्छा नव्हती, असेही काही सदस्यांनी आपल्याला फोन करून कळविल्याचे अध्यक्षा पाटील यांनी सांगितले आहे.
विरोधी सदस्यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट
शिवसेना, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. दरम्यान, या भेटीदरम्यान जिल्हा परिषदेत सत्तांतराच्या संदर्भात चर्चा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते शशीकांत साळुंखे, शिवसेना गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील, सदस्य नानाभाऊ महाजन, दीपकसिंग राजपूत आदी उपस्थित होते. यावेळी जामनेर येथील वादग्रस्त व्यापारी संकुल, आरोग्य विभागातील कारभार यावरही चर्चा करण्यात आल्याची माहिती सदस्य रवींद्र पाटील यांनी दिली. दरम्यान, या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी माजी मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली हेाती. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्यामुळे जिल्हा परिषेदत राजकीय वारे तापले असून सत्तांतराच्या हालचाली सुरू असल्याचे चित्र आहे. भाजपने मात्र, सत्तांतर होणार नाही, असा दावा केला आहे.