बंड करून गेलेले काही नगरसेवक ‘घरवापसी’च्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:12 AM2021-06-29T04:12:33+5:302021-06-29T04:12:33+5:30

अपात्रतेच्या कारवाईची भीती : भाजपची तयारी; गिरीश महाजनांचा मात्र ‘रेड सिग्नल’ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापौर व उपमहापौर ...

Some of the rebellious corporators are preparing to return home | बंड करून गेलेले काही नगरसेवक ‘घरवापसी’च्या तयारीत

बंड करून गेलेले काही नगरसेवक ‘घरवापसी’च्या तयारीत

Next

अपात्रतेच्या कारवाईची भीती : भाजपची तयारी; गिरीश महाजनांचा मात्र ‘रेड सिग्नल’

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीदरम्यान भाजपविरोधात थेट बंड पुकारून शिवसेना उमेदवारांना पाठिंबा देणारे काही बंडखोर आता पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपने नगरसेवकांविरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या प्रस्तावामुळे काही नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये दाखल होण्यासाठी इच्छुक असून, याबाबत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र नकार दिल्याने, या नगरसेवकांची घरवापसी थांबली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही अवघ्या अडीच वर्षात भाजपवर सत्ता गमाविण्याची वेळ आली. शिवसेनेकडे केवळ १५ नगरसेवक असताना, भाजपच्या तब्बल २७ नगरसेवकांना आपल्याकडे खेचून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला होता. मात्र, भाजपमध्ये खोगीरभरती झाल्यानंतर जी गटबाजी भाजपमध्ये फोफावली होती, तीच गटबाजी आता शिवसेनेत देखील फोफावत आहे. त्यातच भाजपकडून बंडखोर नगरसेवकांना अपात्र करण्यासाठी ज्या जोरदार हालचाली सुरू आहेत, त्या पाहता, बंड पुकारून गेलेल्या काही नगरसेवकांच्या पोटात भीतीचा गोळा उभा राहिला आहे. त्यामुळे ‘झाले गेले विसरून’ पुन्हा भाजपमध्ये घेण्यात यावे यासाठी काही नगरसेवकांकडून भाजपचे पदाधिकारी व इतर नगरसेवकांशी संपर्क देखील सुरू केला आहे.

गिरीश महाजनांचा मात्र नकार

एकीकडे बंड पुकारलेले काही नगरसेवक भाजपमध्ये परतण्यास इच्छुक असताना, दुसरीकडे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र या नगरसेवकांना पुन्हा पक्षात घेण्यास नकार दिल्याचीही माहिती भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने दिली आहे. पक्षातून गेलेल्या एकाही नगरसेवकाला परत न घेता, अपात्रतेच्या कारवाईवर गिरीश महाजन ठाम आहेत, तर पक्षातील अनेक पदाधिकारी मात्र, जे पक्षात येण्यास इच्छुक नगरसेवक आहेत, त्यांना पक्षात घेऊन, इतरांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत, असाही एक सूर भाजपमध्ये सुरू आहे. दरम्यान, गिरीश महाजन यांच्या ग्रीन सिग्नलची प्रतीक्षा असून, महाजनांनी परवानगी दिल्यासच या नगरसेवकांची घरवापसी होणार आहे.

कोट..

भाजपमधून फुटून गेलेले काही नगरसेवक परत पक्षात येण्यास इच्छुक आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय घेतला जाईल. अद्यापही या नगरसेवकांच्या घरवापसीबाबत निर्णय झालेला नाही.

- दीपक सूर्यवंशी, जिल्हा महानगराध्यक्ष, भाजप

Web Title: Some of the rebellious corporators are preparing to return home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.