खाद्यतेलाचा काहीसा दिलासा, हिरवी मिरची कडाडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:15 AM2021-05-24T04:15:15+5:302021-05-24T04:15:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव या आठवड्यात कमी झाले असून इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव या आठवड्यात कमी झाले असून इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत. दुसरीकडे हिरवी मिरचीचे भाव वधारले असून भाजीपाल्याच्या भावातही काहीशी वाढ झाली आहे.
गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्य तेलामध्ये सलग दोन आठवडे मोठी भाववाढ झाली होती. मात्र, या आठवड्यात हे भाव काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यात तीन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्य तेलातील ही भाववाढ या आठवड्यात थांबून प्रत्येक तेलामध्ये पाच ते दहा रुपयांची घसरण झाली आहे.
इतर वस्तू स्थिर
डाळींचे भावदेखील वाढले व हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भावदेखील कायम आहेत. मात्र, साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहेत.
कोथिंबीर ८० रुपयांवर
सध्या उन्हाळा सुरू असल्याने भाजीपाल्याचे भाव वाढत आहेत. कोथिंबीर ८० रुपये किलो तर मेथीही ६० रुपये किलोवर आहे. टमाट्याचे भाव १५ रुपये प्रति किलोवर आहे.
हिरवी मिरची ‘तेज’
गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मात्र, कोरोनामुळे लसूण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढत आहेत. लसूण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. यासोबतच बारीक हिरवी मिरचीचा भाव ६० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
खाद्यतेलाचे भाव काहीसे कमी होत असल्याने आर्थिक भार कमी झाला आहे. भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.
- दिलीप बारी, ग्राहक
खाद्यतेलाचे भाव या आठवड्यात काहीसे कमी झाले आहेत. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. सध्या कोरोनामुळे अधिक माल खरेदीवर ग्राहकांचा भर आहे
- संजय वाणी, व्यापारी
सध्या भाजीपाल्याची आवक चांगली आहे. मात्र, हिरव्या मिरचीची आवक घटल्याने तिचे भाव वाढले आहेत. या सोबतच कोथिंबीरचे भाव देखील वधारले आहे.
- राजू चौधरी, भाजीपाला विक्रेते