डाळींचा काहीसा दिलासा, खाद्यतेलात पुन्हा तेजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:03+5:302021-05-31T04:13:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यात कमी झालेल्या खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा थोडी तेजी आली असून, इतर ...

Some relief of pulses, rise again in edible oil | डाळींचा काहीसा दिलासा, खाद्यतेलात पुन्हा तेजी

डाळींचा काहीसा दिलासा, खाद्यतेलात पुन्हा तेजी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यात कमी झालेल्या खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा थोडी तेजी आली असून, इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. दुसरीकडे डाळींचे भाव काहीसे कमी झाले असून, कोथिंबीर, कांद्याचेदेखील भाव उतरले आहे.

गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्यतेलाचे भाव गेल्या आठवड्यात काहीसे कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्यात लोणच्यामुळे खाद्यतेलाला मागणी वाढत असल्याने त्यांचे भाव वाढत आहे. सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १५५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्यतेलातील भाववाढ गेल्या आठवड्यात थांबून प्रत्येक तेलामध्ये पाच ते दहा रुपयांची घसरण झाली होती. मात्र आता पुन्हा तेवढेच भाव वाढले आहे.

डाळींचा दिलासा

डाळींचे भाव कमी झाले आहे. यामध्ये तूरडाळ १०० ते ११५, मूगडाळ १०० ते ११५, हरभरा डाळ ७० ते ८०, उडीद डाळ १०५ ते ११५ रुपये प्रतिकिलोवर आली आहे. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून, रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

कोथिंबीरचे भाव कमी

सध्या उन्हाळा सुरू असल्याने भाजीपाल्याचे भाव वाढत आहे. गेल्या आठवड्यात कोथिंबीर ८० रुपये किलो, तर मेथीही ६० रुपये किलोवर पोहोचली होती. मात्र या आठवड्यात कोथिंबीर ६० रुपये प्रतिकिलोवर आला आहे. टमाट्याचे भाव १५ रुपये प्रतिकिलोवर आहे.

कांदे स्वस्त

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते १५ रुपये प्रतिकिलोवर आले आहे. लसण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढलेलेच आहे. लसण १०० ते १४० रुपये, तर लिंबू ६० रुपये प्रति किलोवर कायम आहे. यासोबतच बारीक हिरवी मिरची ६० रुपये प्रति किलोवर आहे.

खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढल्याने आर्थिक भार वाढला आहे. मात्र डाळीचे भाव कमी झाल्याने तसेच भाजीपालादेखील स्थिर असल्याने दिलासा आहे.

- रमेश जाधव, ग्राहक

कमी झालेले खाद्यतेलाचे भाव या आठवड्यात पुन्हा वाढले आहे, तर डाळींचे भाव काहीसे कमी झाले आहे. इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे.

- ईश्वर चौधरी, व्यापारी

गेल्या आठवड्यात भाववाढ झालेल्या कोथिंबीरचे भाव तसेच कांद्याचे भाव या आठवड्यात कमी झाले आहे.

- शरद सोनवणे, भाजीपाला विक्रेते

Web Title: Some relief of pulses, rise again in edible oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.