आधीच त्यांचे गाव लांब, मग काय विचारता! जळगावमध्ये शिकायला आलेले काही विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी घरी जाताच आले नाही
By अमित महाबळ | Published: October 23, 2022 10:13 PM2022-10-23T22:13:30+5:302022-10-23T22:14:13+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत.
जळगाव : दिवाळीचा सगळीकडे उत्साह आहे. बाहेरगावी शिक्षण वा नोकरीसाठी गेलेले जळगावात परतले आहेत. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासमवेत दीपोत्सव साजरा करत आहे पण जळगावमध्ये बाहेरगावहून शिकायला आलेले काही विद्यार्थी असेही आहेत, की त्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी जाता आलेले नाही.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पाच विद्यार्थ्यांची गावे दूर असल्याने ते हॉस्टेलवरच थांबून आहेत. यामध्ये तीन विद्यार्थिनी आहेत. लक्ष्मीपूजन, भाऊबीज यासारखे दिवाळीतील महत्त्वाचे दिवस त्यांना कुटुंबापासून दूर राहून साजरे करावे लागणार आहेत. ऋची झा ही विद्यार्थिनी एमबीबीएसच्या चतुर्थ वर्षाला आहे. ती चार वर्षांपासून जळगावात शिकायला आहे. आताची तिची दुसरी दिवाळी अशी आहे, की तिला घरी जाता आलेले नाही. परिवारासोबत दिवाळी साजरी करता येत नसल्याची रूखरूख तिच्या मनात आहे. तिचे गाव (कोची) केरळमध्ये आहे. जळगावहून गावी जायला दोन दिवस लागतात आणि पुढच्या महिन्यात परीक्षा आहे. त्यामुळे अभ्यासाला महत्त्व द्यावे लागत आहे.
ती जळगावात, बहिण दिल्लीत, भाऊ केरळमध्ये -
ऋची हिची बहीण सिव्हील सर्व्हिसची तयारी करण्यासाठी दिल्लीत आहे. लहान भाऊ, आई व वडील केरळमध्ये आहेत. हॉस्टेल लाईफची सवय झाली आहे. दिवाळीचा आनंद म्हणून एक दिवस अभ्यासातून सुटी घेईल, सगळ्या जणी मिळून जेवायला जाऊ. तेच आमच्यासाठी सेलिब्रेशन असेल, असे ऋची म्हणाली. हॉस्टेलमधील इतर विद्यार्थिनी दिवाळीसाठी आपापल्या गावी गेलेल्या आहेत.
रेल्वे वा विमानाने जा, मिरांगासाठी प्रवास बराच मोठा -
नवी पेठेतील विद्यार्थी वसतिगृहात राहणारा मिरांगा हा मूळचा अरूणाचल प्रदेशातील आहेत. इटानगरजवळ त्याचे गाव आहे. जळगावहून रेल्वेने जायचे तर अडीच दिवस लागतात. मुंबईमार्गे विमानाने जायला एक दिवस लागतो. रेल्वे वा विमान कसेही जा, गोहात्तीपासून पुढे सात ते आठ तासांचा बसचा प्रवास करावाच आहे. पुढच्या महिन्यात त्याचीही परीक्षा आहे. त्यामुळे तो दिवाळीला घरी गेला नाही. घरी आई-वडील, बहिण व भाऊ आहेत. त्यांच्यासमवेत दिवाळी साजरी करायला मिळणार नाही पण जळगावमध्ये मित्रांसोबत दिवाळी साजरी करू, असे मिरांगा म्हणाला.