चाळीसगाव येथील भाजप नगरसेवकासह पुत्राला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 06:53 PM2020-05-14T18:53:35+5:302020-05-14T18:53:41+5:30
शेतातून पकडले : राष्ट्रपुरुषाची प्रतिमेची विटंबना व पाटील कुटुंबावर हल्ला प्रकरण
चाळीसगाव - राष्ट्रपुरुषाची प्रतिमा असलेल्या बॅनरची विटंबना केली व अर्जुनसिंग पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर घरात घुसून हल्ला करून मारहाण प्रकरणी भाजपचे नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी व त्यांचा मुलगा राहुल राजेंद्र चौधरी या दोघांना गुरुवारी रात्री २ वाजेच्या सुमारास बहाळ शिवारातील मक्क्याच्या शेतातून पोलिसांच्या पथकाने अटक केली.
चाळीसगाव शहरातील देवकर मळ्यात नगरसेवक राजेंद्र रामदास चौधरी यांच्या मालकीचे जागेवर अपार्टमेंटचे बांधकाम सुरू होते. याठिकाणी मजुरांसाठी केलेल्या मुतारीला राष्ट्रपुरुषाची प्रतिमा असलेले बॅनर लावून चौधरी यांनी विटंबनेचा प्रकार केला.याबाबतची विचारणा अर्जुनसिंग पाटील यांनी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचेकडे केली असता उलट त्यांनाच चौधरी यांनी काठीने मारहाण केली. यावेळी अर्जुनसिंगची आई मिनाबाई व भाऊ करणसिंग हे भांडण सोडवण्यासाठी आले असता राजेंद्र चौधरी यांचे भाऊ व मुलांनी पाटील कुटुंबावर तलवारीने हल्ला केला म्हणून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला राजेंद्र चौधरी यांच्यासह सहा जणांविरोधात भादवी कलम गुन्हां दाखल करण्यात आला आहे.
यानंतर चाळीसगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना राजेंद्र चौधरी हे बहाळ शिवारात लपलेले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मयुर भामरे, पोहेकॉ बापूराव भोसले, पोना गणेश पाटील, पंढरीनाथ पवार, नितीन पाटील, भटू पाटील, राहुल गुंजाळ, संदिप पाटील, भूषण पाटील, संदिप पाटील यांच्या पथकाने राजेंद्र चौधरी व त्यांचा मुलगा राहुल चौधरी यांना बहाळ शिवारातील मक्याच्या शेतातून गुरुवारी रात्री २ वा. अटक केली. याप्रकरणातील आणखी चार जण फरार असून त्यांचाही शोध पोलीस घेत असल्याचे सांगण्यात आले.
दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडी
नगरसेवक राजेंद्र चौधरी व त्यांचा मुलगा राहुल चौधरी या दोघांना १४ रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.