जावई घरी पोहोचला आणि घरात सासरा व शालकाचा मृतदेह दिसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:39+5:302021-03-13T04:28:39+5:30

जळगाव : आदर्शनगरातील दीपक रतिलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४) या पिता-पुत्राने राहत्या घरात विष प्राशन करून ...

The son-in-law reached home and found the bodies of father-in-law and sister-in-law in the house | जावई घरी पोहोचला आणि घरात सासरा व शालकाचा मृतदेह दिसला

जावई घरी पोहोचला आणि घरात सासरा व शालकाचा मृतदेह दिसला

Next

जळगाव : आदर्शनगरातील दीपक रतिलाल सोनार (वय ६५) व मुलगा परेश (३४) या पिता-पुत्राने राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री ९ वाजता झाली. वारंवार फोन करून सासरे प्रतिसाद देत नसल्याने जावई घरी आल्यानंतर ही घटना उघड झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सोनार हे पत्नी श्रद्धा व मुलगा परेश यांच्यासह आदर्शनगरात वास्तव्याला होते. पत्नी सराफ बाजारात दागिने पाॅलिश करण्याचे काम करतात. दीपक सध्या घरीच होते तर मुलगा मतिमंद होता. मुलगी रूपाली विवाहित असून, नंदुरबारला सासरी असते. पत्नी श्रद्धा यांना न्यूमोनिया व इतर आजार झाल्याने त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दीड लाख रुपये खर्च झाले तरी प्रकृतीत सुधारणा होत नाही. हा दवाखान्याचा खर्च जावई रूपेश सोनार यांनी केला. आता अजून पाच लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने दीपक सोनार नैराश्यात आले होते, असे सांगण्यात आले.

जावयामुळे उघड झाली घटना

मुलगी व जावई रुग्णालयात असताना दीपक सोनार यांना फोन करत होते; मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने जावई घरी आले असता, त्यांना सासरे व शालक मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची शेजारी चर्चा होताच, मनपा स्थायी समितीचे सभापती राजेंद्र घुगे-पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने रामानंदनगर पोलिसांना कळविले. त्यानंतर रुग्णवाहिका आणून मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना केले. तेथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. दरम्यान, रामानंदनगर पोलीस ठाण्याचे हवालदार सतीश डोलारे व सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. परंतु, दोघांनी नेमके कोणते विष घेतले, हे समजू शकले नाही.

कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह

दीपक सोनार यांच्या पत्नी श्रद्धा या अपेक्स या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत, त्यांना कोरोना असल्याचे सांगितले जात होते. याबाबत खात्री करण्यासाठी रुग्णालयाचे डॉक्टर समीर चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, श्रद्धा यांची अँटिजन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे; मात्र शुक्रवारी आरटीपीसीआर टेस्ट घेतली जाणार होती. न्यूमोनिया गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचेही डॉ. चौधरी यांनी सांगितले.

पत्नीला नाही सांगितली घटना

पती व मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली असली तरी याबाबत श्रद्धा यांना कळविण्यात आलेले नाही, ही माहिती गोपनीय ठेवण्यात आलेली आहे. शुक्रवारी सकाळी पिता-पुत्राचे शवविच्छेदन होणार आहे. दरम्यान, या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

Web Title: The son-in-law reached home and found the bodies of father-in-law and sister-in-law in the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.