नील गायीच्या मत्यूबाबत सोनवणेंची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:31 AM2020-12-14T04:31:02+5:302020-12-14T04:31:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गुरुवारी शहरातील एमआयडीसी भागात मोकाट श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नील गायीच्या बछड्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गुरुवारी शहरातील एमआयडीसी भागात मोकाट श्वानांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नील गायीच्या बछड्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे झालेल्या मृत्यूबाबत जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंगे यांनी वनपाल सोनवणे यांची चौकशी केली आहे, अशी माहिती वनविभागातील सूत्रांनी दिली आहे. याबाबत उपवनसंरक्षकांनी सोनवणे यांना बोलावून घेत याबाबत खुलासा सादर करण्याच्याही सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गुरुवारी (दि.१०) एमआयडीसी भागातील एस सेक्टरमध्ये मोकाट श्वानांच्या हल्ल्यात नील गायीचे बछडे जखमी झाले होते. या बछड्याला वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष रवींद्र फालक यांनी ताब्यात घेऊन, प्राथमिक उपचारदेखील केले. याबाबत त्यांनी वनविभागाला सूचना दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बछड्याला मालवाहू रिक्षातून उपचारासाठी वन्यजीव रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मानसिक धक्क्यामुळे उपचारानंतर काही वेळातच या बछड्याचा मृत्यू झाला होता. फालक यांनी हे बछडे ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना रात्री उपचार न करता सकाळी उपचार करण्याची विनंती केली होती. तसेच कोणत्याही हल्ल्यातून बचावलेल्या वन्यप्राण्याचा पुन्हा मानवाशी संबंध आल्यामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला होता. दरम्यान, नील गायीच्या बछड्याच्या मृत्यूबाबत वन्यजीवप्रेमींमध्ये संताप होत असून, लांडोरखोरीमध्येदेखील काही सर्प दगावत असल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे वनपाल सोनवणे यांची चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात होती. या मागणीनंतर वनविभागाने सोनवणेंकडून खुलासा मागितला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, जिल्हा उपवनसंरक्षक यांनी याबाबत वनविभागाची चूक नसल्याचे ‘लोकमत’ ला सांगितले.