सोनबर्डी खडके खुर्द वळणावर दुचाकीला अपघात; गारखेडाचा युवक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 22:32 IST2021-02-03T22:32:30+5:302021-02-03T22:32:52+5:30
दुचाकीच्या अपघातात गारखेडाचा युवक जागीच ठार झाला.

सोनबर्डी खडके खुर्द वळणावर दुचाकीला अपघात; गारखेडाचा युवक जागीच ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
एरंडोल : सोनबर्डी खडके खुर्द येथील वळणावर दुचाकीच्या अपघातात गारखेडाचा युवक जागीच ठार झाला.
सचिन मधुकर पाटील (२५, गारखेडा, ता. धरणगाव) हा तरुण दुचाकी (एमएच१९बीआय२५३७) या दुचाकीने कासोद्याकडून एरंडोलकडे येत असताना सोनबर्डी फाट्यापासून थोड्या अंतरावरील खडके खुर्दकडे जाणाऱ्या रस्त्याच्या वळणावर पहाटेच्या अंधारात वळण लक्षात न आल्याने दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी बाजूच्या खड्ड्यात जाऊन कोसळली. त्यात दुचाकीचालक सचिन पाटील हा जागीच ठार झाला.
उजेड पडल्यावर सोनबर्डी फाट्यावरील वीटभट्टीचालकांच्या अपघात झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्याबाबत खडके खुर्द पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना कळविले. त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला माहिती दिल्यावर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते. हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख राजू पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
ग्रामस्थांचा रास्ता राेको
एरंडोल कासोदा रस्त्यावरील हे वळण काढण्यात यावे, या मागणीसाठी कासोद्याच्या ग्रामस्थांनी जवळपास पंधरा ते वीस मिनिटे रास्ता रोको आंदोलन केले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव व सहायक पोलीस निरीक्षक तुषार देवरे हे घटनास्थळी तत्काळ दाखल होऊन त्यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.