१ लाख ७१ हजारांचे बिल तक्रार करताच झाले ६० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:15 AM2021-04-16T04:15:59+5:302021-04-16T04:15:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : १३ दिवसांच्या उपचारांचे नियमबाह्य १ लाख ७१ हजार बिल आकारल्यानंतर याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनी लेखाधिकाऱ्यांकडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १३ दिवसांच्या उपचारांचे नियमबाह्य १ लाख ७१ हजार बिल आकारल्यानंतर याबाबत रुग्णाच्या नातेवाइकांनी लेखाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच रुग्णालयाने हे बिल थेट १ लाख ७१ हजार वरून ६० हजारांवर आणले. सारा हॉस्पिटलमधील या प्रकाराबाबत नाचणखेडा, ता. जामनेर येथील रुग्णाच्या नातेवाइकांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवदेन दिले असून, रुग्णालयाची मान्यता रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोविडच्या खासगी रुग्णालयांकडून शासकीय दरांव्यतिरिक्त अनेक छुपे दर लावून अवाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याच्या अनेक तक्रारी समोर येत होत्या. नाचणखेडा येथील शेहनाजबी आबेद पटेल यांना जळगाव शहरातील सारा रुग्णालयात २ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांत त्यांच्या नाकात फंगल इंफेक्शन वाढत असल्याचे सांगत शस्त्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. शस्त्रक्रियेनंतरचे सर्व औषधी व इंजेक्शन नातेवाइकांनी बाहेरून आणले. १४ रोजी डिस्चार्ज देण्याचे डॉ. मिनाज पटेल यांनी सांगितले होते. त्यादिवशी थेट १ लाख ७१ हजार ५५० रुपयांचे बिल नातेवाइकांना देण्यात आले. ते कमी करण्याची विनंती केली असता, बाहेर काढून दिले. त्यानंतर नातेवाइकांनी लेखाधिकारी कैलास सोनार यांना मोबाइलद्वारे हे कळविले असता ते तातडीने आले. त्यांनी डॉक्टरांना शासनाचे आदेश दाखविल्यानंतर डॉ. मिनाज पटेल यांनी बिल कमी करून ६० हजार रुपये केले. मात्र, रुग्णाचा डिस्चार्ज चार तास लांबविला. शिवाय जबदरस्तीने १४ हजारांची औषधी घ्यायला लावल्याचा आरोप शोएब नूरमोहम्मद पटेल यांनी जिल्हाधिकारऱ्यांकडे केली आहे.
कोविडचे बिल हे शासकीय नियमानुसारच आकारण्यात आले होते. मात्र, रुग्णाला म्युकोरमायकोसिस या फंगल इन्फेक्शनच्या आजाराचे वेगळे उपचार सुरू होते. त्याचे हे बिल होते. मात्र, रुग्णाचे नातेवाईक अत्यंत जबरदस्ती करीत होते. त्यामुळे अखेरीस ते बिल कमी करावे लागले.
-डॉ. मिनाज पटेल, सारा हॉस्पिटल