‘अनलॉक’होताच ठिकाठिकाणी पुन्हा उसळली नागरिकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 12:56 PM2020-07-15T12:56:46+5:302020-07-15T12:57:11+5:30
जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून पाळण्यात आलेला सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर मंगळवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी ...
जळगाव : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून पाळण्यात आलेला सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर मंगळवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी उसळली. संकूल वगळता सर्व दुकाने सम-विषम पद्धतीने उघडल्यामुळे खरेदीसाठी सर्वच दुकानांबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गेल्याच आठवड्यात सोमवारीही नागरिकांनी प्रचंड गर्दी करीत खरेदी केली होती.
आता लॉकडाऊन उघडल्यानंतर पहिल्याच दिवशी नागरिकांची ठिकठिकाणी अक्षरश: गर्दी उसळली होती. यागर्दीमुळे कोरोनाला पुन्हा निमंत्रण मिळू शकते असे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे.
सात दिवसांचा कडक लॉकडाऊन घेतला तर कोरोनाची साखळी तुटेल व संसर्ग काही प्रमाणात नियंत्रणात येईल अशी अपेक्षा असताना अनलॉकच्या पहिल्याच दिवशी गेल्याच आठवड्यात सोमवारप्रमाणेच नागरिकांनी दिवाळीसारखी खरेदी करीत साहित्य, भाजीपालासोबतच नागरिकांनी कोरोनाचीही खरेदी केल्याचे चित्र पहायला मिळाले.
अनेक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडवत रस्त्यावर उतरल्याचे चित्र मंगळवारी दिसून आले.
किराणा, भाजीपाला खरेदीसाठी झुंबड
सात दिवसात किराणा व भाजीपाला विक्री देखील बंद करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी १० वाजेपासून शहरातील मुख्य भागातील किराणाच्या दुकानांवर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. यासह भाजीपाला खरेदीसाठीही नागरिकांची झुंबड उडालेली पहायला मिळाली. शिवतीर्थ मैदान, ख्वाजामिया चौक, महाबळ चौक, गिरणा टाकी परिसरात भाजीपाला विक्रेत्यांनीही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करीत आपली दुकाने थाटली होती. शहरात अनेक भागात भाजीपाला विक्रेते रस्त्यांवर बसले होते. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली असताना आता लगेच साहित्य संपले की काय अशाही चर्चा होऊ लागली.
चोरी-चोरी चुपके-चुपके व्यवसाय सुरु
मनपाने सम-विषम प्रमाणे व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली असली तरी मंगळवारी मुख्य रस्त्यालगत या नियमांचा सर्रासपणे भंग झाल्याचे चित्र पहायला मिळाले. अनेक दुकानदारांनी शटर बंद करून व्यवसाय सुरु ठेवला होता. अनेक मार्केटच्या तळमजल्यालगतच्या दुकानांमध्ये ग्राहकांना प्रवेश देवून शटर बंद केले जात असल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे प्रत्येक चौकात महापालिकेचा कर्मचारी उभा असतानाही हे प्रकार सर्रास पणे होताना दिसून आले.