पोलिसांची कुणकुण लागताच भिवंडीतून झाला होता तो पसार..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 11:47 PM2019-09-16T23:47:57+5:302019-09-16T23:48:14+5:30
सराफाला विकलेल दानिने हस्तगत : दोघांना अटक तर विधीसंघर्ष बालकास घेतले होते ताब्यात
जळगाव- गांधीनगरातील डॉक्टराच्या घरात डल्ला मारल्यानंतर मुद्देमालासह मोनूसिंग बावरी हा भिवंडी येथे पसार झाला होता़ ही माहिती मिळताच पोलिसांनी भिवंडीत धाव घेतली़ मात्र, आपल्या शोधार्थ पोलीस आल्याची कुणकुण बावरीला लागताच तो भिवंडीतून पसार झाला होता़ अखेर जळगावात पोलिसांना त्याला पकडण्यास यश आले आहे़ दरम्यान, त्याच्याजवळून ५ लाख ६० हजार रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिक येथे गेलेले डॉ़बाळकृष्ण नेहते यांच्या घरातून सुमारे साडेसात लाखांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ही घरफोडी मोनूसिंग बावरी याने केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती़ दरम्यान, त्याला अटक करण्यात आधीच त्याच्या साथीदारांचा शोध जिल्हापेठ पोलिसांनी घेतला़ गुरूजितसिंग बावरी व एका विधी संघर्ष बालकास पोलिसांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली़ अखेर त्यांनी मोनूसिंग याच्यासोबत मिळून घरफोडी केल्याची पोलिसांना कबुली दिली़ तो भिवंडी येथे असल्याची माहिती पोलिसांना दिली़
नातेवाईकाच्या घरी घेतला आश्रय
मोनूसिंग हा भिवंडीत असल्याची माहिती मिळताच जिल्हापेठ व एलसीबीचे पथक भिवंडी येथे रवाना झाले़ यावेळी मोनूसिंग याने नातेवाईकाकडे आश्रय घेतला होता़ दरम्यान, आपल्या शोधार्थ पोलीस भिवंडी येथे आल्याची कुणकुण त्याला लागताच त्याने जळगाव शहराकडे धाव घेतली़ त्याच दरम्यानात पोलिसांना त्याच्या नातेवाईकाची माहिती मिळताच चौकशीसाठी ताब्यात घेतले व मोनू हा शहरात परतल्याची माहिती दिली़ अखेर पोलिसांनी जळगाव रेल्वेस्थानकावरून त्यास अटक केली़
सराफाला विकले दागिने
जिल्हापेठ पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्यानंतर मुद्देमालाविषयी चौकशी केली असता त्यांनी विनोद सुभाषचंद्र जैन यास दानिगे विकल्याची माहिती दिली़ त्यानुसार रविवारी सराफाला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला़नंतर न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जामिन मंजूर झाला़ तब्बल ५ लाख ६० हजार रूपयांचा ऐवज या संशयितांकडून हस्तगत करण्यात आला आहे़
आणखी घरफोड्या येतील उघडकीस
काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी चोऱ्यांचे सत्र सुरू केले होते़ त्यात या तिघांचा समोवश असावा असा संशय पोलिसांचा आहे़ तसेच रामानंदनगर व एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोड्या सुध्दा या तिघांनी केला असाव्यात, असा संशय पोलिसांना असून त्यानुसार कसून चौकशी करण्यात येत आहे़