जनता कर्फ्यू संपताच बाजार समितीत ६२९ क्विंटल भाजीपाल्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 AM2021-03-16T04:17:13+5:302021-03-16T04:17:13+5:30
जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या तीन दिवसांच्या बंदनंतर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ...
जळगाव : वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूच्या तीन दिवसांच्या बंदनंतर सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला, फळे यांची नियमित आवक सुरू झाली. यामध्ये बंदनंतरच्या पहिल्याच दिवशी ६२९ क्विंटल भाजीपाल्याची आवक झाली. या सोबतच फळे, कांदा, बटाटेदेखील नेहमीप्रमाणे आले असून खरेदीदारांनाही ते सहज उपलब्ध झाले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १२ ते १४ मार्च दरम्यान जनता कर्फ्यू जाहीर केला. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहारदेखील बंद ठेवण्याचे आदेश होते. जनता कर्फ्यूच्या या काळात पहिल्या दिवशी १२ मार्च रोजी बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी आपला माल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणला. मात्र प्रवेश नाकारण्यात आल्याने मोठा गोंधळ झाला व शेतकऱ्यांनी हा माल फेकून दिला होता. त्यानंतर दोन दिवस भाजीपाल्याची आवक बंद राहिली.
सोमवार, १५ मार्च रोजी बाजार समिती सुरू झाल्यानंतर या ठिकाणी जिल्ह्यातील एरंडोल, पारोळा व इतर तालुक्यांसह मराठवाडा भागातून भाजीपाला आला. यात एकूण ६२९ क्विंटल भाजीपाला सोमवारी दाखल झाला. या सोबतच ८९ क्विंटल फळे, एक हजार ८८ क्विंटल कांदा, ३५० क्विंटल बटाटे बाजार समितीमध्ये दाखल झाले. जनता कर्फ्यू काळात मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागातून येणारे बटाटेदेखील येत नव्हते. सोमवारी त्यांचीही आवक सुरू झाली.
बाजार समितीमधील आवक (क्विंटलमध्ये)
माल आवक
भाजीपाला ६२९
फळे ८९
कांदा १०८८
बटाटे ३५०