सोयाबीन निघताच भाव गडगडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:17 AM2021-09-27T04:17:27+5:302021-09-27T04:17:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यावर्षी जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे उडीद व मुगाचा हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : यावर्षी जिल्ह्यात पावसाच्या अनियमिततेमुळे उडीद व मुगाचा हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा या सोयाबीनवर होत्या. कारण, जिल्ह्यात बऱ्याचठिकाणी अतिवृष्टी झाली असली तरी सोयाबीनचे पीक तग धरून होता. सोयाबीनला चांगला भाव असल्याने शेतकरी आनंदित होते. मात्र, सोयाबनीचे पीक आता काढण्यास सुरुवात होईल, तोच सोयाबीनचे भाव गडगडले असून, शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
गेल्या दोन वर्षांत सोयाबीनकडे ‘कॅश क्रॉप’ या अर्थाने पाहिले जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्रदेखील वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचा दर ११ हजारांवर पोहोचला होता. मात्र, यंदाच्या खरिपाचे सोयाबीन बाजारात येताच दरात ५ ते ६ हजारांनी भावात घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागच्या हंगामात परतीच्या पावसाने सोयाबीनची वाट लागली. माल डागी झाल्याने प्रतवारी घसरली व शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात सोयाबीन विकले. उत्पादन कमी आल्याने जानेवारीपश्चात दरात वाढ व्हायला सुरू झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात डीओसीची मागणी वाढल्याने ऑगस्ट महिन्यात सोयाबीनचा भाव १० हजार रुपयांच्या पार गेला. मात्र, त्यानंतर महिनाभरात शेतकऱ्यांचा माल बाजारात येताच आवक वाढली व दरात तब्बल पाच हजारांनी घसरण झालेली आहे. अशीच स्थिती राहिल्यास उत्पादन खर्चही पदरी पडणार की नाही, अशी भीती निर्माण झालेली आहे.
सोयाबीनचा पेरा
२०१८ - २१ हजार
२०१९ - २३ हजार
२०२० - २४ हजार
२०२१ - २९ हजार
सोयाबीनचे दर (प्रतिक्विंटल)
जानेवारी - ४ हजार १८३
मार्च - ५ हजार ३४०
जून - ७ हजार ५००
जुलै - ९ हजार
ऑगस्ट - १० हजार ४००
सप्टेंबर - ५ हजार ५००
पैसा भरपूर खर्च केला, आता काय करू?
उडीद व मुगाचे नुकसान झाल्यानंतर आता सोयाबीनला चांगला भाव मिळेल व उडीद, मुगाचे झालेले नुकसान भरून निघेल, अशी आशा होती. मात्र, आता सोयाबीन ऐन काढणीवर आले असतानाच अचानक सोयाबीनच्या भावात मोठी घट झाली आहे. केवळ व्यापाऱ्यांचे हे षड्यंत्र असून, कमी भावात माल घेऊन जास्त भावात विक्री करण्याचा हा व्यापाऱ्यांचा डाव आहे.
-विठ्ठल जानकीराम पाटील, शेतकरी
गेल्या वर्षी परतीच्या पावसामुळे सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात खराब प्रतवारी असतानाही सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. मात्र, यावर्षी सोयाबीन पीक इतर पिकांच्या तुलनेत चांगले आले असून, अशा प्रकारे एकाच महिन्यात सोयाबीनचा भाव ५ हजार रुपयांनी कमी करण्यात आला आहे. यामागे व्यापाऱ्यांची खेळी असून, शासनदेखील व्यापाऱ्यांचाच बाजूने दिसून येत आहे.
-कपिल चौधरी, शेतकरी
विकण्याची घाई करू नका
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी कमी झालेली आहे. त्यात शासनाच्या आयात धोरणाचा परिणाम झालेला आहे. आता नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने दरवाढ होण्याची सध्या तरी शक्यता दिसत नाही. मात्र, घाई गडबडीत शेतकऱ्यांनी माल विक्री करण्याची घाई करू नये.
-विकास बियाणी, व्यापारी
गेल्या काही महिन्यांत सोयाबीनचे दर सारखे घसरत आहेत. याला कारण म्हणजे मागणी कमी आणि आवक जास्त. कारण आता नवीन माल बाजारात येऊ लागला आहे. या मालात आर्द्रताही जास्त आहे. अशा परिस्थितीत सध्यातरी भाववाढ होण्याची शक्यता दिसत नाही.
-कमलाकर वाणी, व्यापारी