ज्वारी बियाण्याची काळ्याबाजारात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 06:24 PM2020-11-28T18:24:32+5:302020-11-28T18:26:04+5:30
मागणी असलेल्या ज्वारीच्या एका वाणाची काळ्याबाजारात जादा भावाने विक्री होत आहे.
अशोक परदेशी
भडगाव : शहरासह तालुक्यात मागणी असलेल्या ज्वारीच्या एका वाणाची काळ्याबाजारात जादा भावाने विक्री होत आहे. शहरासह तालुक्यात काही कृषी केंद्रचालक लूट करीत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. एकीकडे बियाण्याची तूट तर दुसरीकडे लूट होत असल्याची शेतकऱ्यांची व्यथा आहे.
खरीप हंगामात ज्वारीचे पेरणी उद्दिष्ट ३२८६ हेक्टर होते. शेतकऱ्यांनी ज्वारीच्या विविध वाणांची पेरणी केली होती. यात ज्वारीच्या एका कंपनीचे वाण चांगले उत्पन्न देणारे ठरले आहे. ज्वारीचा चाराही जनावरांना चांगला उपयोगी पडतो. काही शेतकऱ्यांना सततच्या पावसाने ज्वारीच्या कणसातील दाणे काळे पडल्याने नुकसानही झाले. मात्र या ज्वारीचे दादरप्रमाणे धान्य आहे. त्यामुळे खरीप हंगामाप्रमाणे या रब्बी हंगामातही बहुतांश शेतकऱ्यांनी या ज्वारी पिकाची पेरणी केली आहे. भडगाव तालुक्यात कृषी विभागास ज्वारी पेरणीचे उद्दिष्ट फक्त ९११ हेक्टर क्षेत्र आहे. मात्र आतापर्यंत तालुक्यात एकृण २८३४ हेक्टर क्षेत्रावर ज्वारीच्या पिक पेरण्या झाल्या आहेत. आता जामदा उजवा व डावा कालव्यांना नुकतेच प्रशासनाने रब्बी हंगाम पिक पेरण्यांसाठी पाण्याचे ३ आवर्तने जाहीर केलेले आहेत. त्यामुळे भडगाव तालुक्यात आतापर्यंत रब्बी हंगामात ज्वारी पिकाची सर्वाधिक पेरणी झाली आहे अन अजूनही ज्वारी पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. ज्वारीला चांगला भाव मिळेल जनावरांना चारा मुबलक मिळेल. खर्ज कमी मेहनत कमी यामुळे शेतकऱ्यांना आशा आहे.
दरम्यान, ज्वारी बियाण्याच्या एका वाणाची मागणी जास्त आहे. खरीप हंगामात मागेही तीन किलो ज्वारी बियाण्याची थैली बाजारात ५३० रुपये मूळ किमतीला विक्री झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मात्र सध्या तर १२०० रुपये ते १५०० रुपये जादा भावाने पावती न देता सर्रास दुकानदार काळया बाजारात विकत असल्याची शेतकरी वर्गात चर्चा होत आहे.
या बियाण्याचा तुटवडा निर्माण करुन काळयाबाजारात विक्रीतून शेतकऱ्यांची काही दुकानदारांकडून लूट होत असल्याची चर्चा आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
भडगाव शहरासह तालुक्यात एका ज्वारीचे बियाणे काही कृषी केंद्रांवर जादा भावाने शेतकऱ्यांना विक्री होत असल्याची माहिती मिळत आहे. शेतकऱ्यांना पावतीही दिली जात नाही. तरी अशी फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी संबंधीत कृषी केंद्रधारकांची तक्रार करावी. पावती असो वा नसो तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत कृषी केंद्रचालकाची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
-बी.बी.गोरडे, तालुका कृषी अधिकारी, भडगाव