कर्णकर्कश आणि म्युझिकल हॉर्नचा दणदणाट अन‌् सगळ्यांचेच कानावर हात...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:10 AM2021-02-19T04:10:41+5:302021-02-19T04:10:41+5:30

जळगाव : कर्णकर्कश आणि म्युझिकल हॉर्नचा गोंगाट शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून फॅन्सी, पोलीस, ॲम्ब्युलन्सचा सायरन तसेच बुलेटच्या ...

The sound of loud and musical horns and hands on everyone's ears ...! | कर्णकर्कश आणि म्युझिकल हॉर्नचा दणदणाट अन‌् सगळ्यांचेच कानावर हात...!

कर्णकर्कश आणि म्युझिकल हॉर्नचा दणदणाट अन‌् सगळ्यांचेच कानावर हात...!

Next

जळगाव : कर्णकर्कश आणि म्युझिकल हॉर्नचा गोंगाट शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चालला असून फॅन्सी, पोलीस, ॲम्ब्युलन्सचा सायरन तसेच बुलेटच्या सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून फटाक्यांसारखा आवाज निर्माण करण्याच्या फॅडमुळे जळगावकरांच्या कानठळ्या बसत आहेत. हॉर्नच्या नावाखाली सुरू असलेल्या या दणदणाटाबाबत सर्वांनीच कानावर हात ठेवले आहेत. दरम्यान, कर्णकर्कश आणि म्युझिकल हॉर्नचाच दणदणाट करणाऱ्या ८१ वाहनधारकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दंडुका उगारला असून, त्यांना ४० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे.

एप्रिल ते सप्टेंबर, ऑक्टोबर या काळात कडक लॉकडाऊन होता, त्यामुळे बाहेर वाहनेच काय, परंतु नागरिकांनाही निघायला निर्बंध होते. मात्र, लॉकडाऊन संपल्यानंतर वाहने सुसाट सुटली. दिवाळीत फटाके फुटले, या काळात ध्वनिप्रदूषण मोठे वाढले. दुचाकींना हॉर्न बसविण्यासह सायलेन्सरमध्ये तांत्रिक बदल करून मोठा आवाज निर्माण केला जातो. शहरात काही लोकप्रतिनिधी तसेच स्वत:ला डॉन म्हणविणाऱ्यांनी तर आपल्या चारचाकीला पोलीस सायरन बसविला आहे. रस्त्याने वावरताना प्रामुख्याने हे वाहन लोकांच्या नजरेस पडते, वाहतूक शाखेच्या नजरेस हे वाहन अजून पडलेले नाही की पडून देखील कानाडोळा झाला आहे, हे समजायला मार्ग नाही. एकूणच कर्णकर्कश आणि म्युझिकल हॉर्नच्या दणदणाटाने जळगावकरांच्या चांगल्याच कानठळ्या बसल्या आहेत.

कर्णकर्कश हॉर्न : ४३

म्युझिकल हॉर्न : ३८

एकूण दंड : ४०,५००

वर्षभरात केवळ ८१ जणांवर कारवाई

गेल्या वर्षभरात शहर वाहतूक शाखेतर्फे म्युझिकल हॉर्न बसविणाऱ्या ३८ तर कर्णकर्कश हॉर्न बसविणाऱ्या ४३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ४० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे. त्यापैकी ९ जणांनी साडेचार हजार रुपये दंड भरला आहे तर ७२ जणांकडे ३६ हजार रुपये दंड प्रलंबित आहे. मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकाला ५०० रुपये दंड ठोठावला जातो. दंडात्मक कारवाईनंतर कृतीत बदल झाला नाही तर संबंधित वाहन चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल होऊ शकतो.

बाळाचे रडणे, सायरनमुळे भीती

फॅन्सी हॉर्नसह घाबरविणाऱ्या हॉर्नचीही भर पडत असून, त्यामुळे नागरिकांमध्ये धडकी भरते. चारचाकीला तर चक्क एखाद्या बाळाला धक्का लागल्यानंतर तो रडतो तसाच हॉर्न काही जणांनी बसविला आहे. त्याशिवाय काही जणांनी कारला पोलिसांचा सायरन तर अग्निशमन बंबाचा सायरन लावण्यात आलेला आहे. त्यामुळे पुढे चालणारी वाहने आपोआप या वाहनांना रस्ता मोकळा करून देतात. नंतर लक्षात येते की, हे पोलीस किंवा अग्निशमन बंबाचे वाहन नाही.

गोंगाटामुळे नागरिक त्रस्त, पण नाईलाज

- शहरात दुचाकी व चारचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. जिल्ह्यातील आकडा तर चार ते पाच लाखांच्या घरात गेलेला आहे. त्यातच वेगवेगळ्या फॅन्सी आवाजाचा हॉर्न बसविण्याची क्रेझ वाढतच चालली आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाचा उच्चांक वाढत चालला आहे. मात्र, ध्वनिप्रदूषण मोजलेच जात नाही. डी.जे. व फटाक्यांचे ध्वनिप्रदूषण मोजण्याची यंत्रणा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे आहे. परंतु त्यांच्याकडून दखलच घेतली जात नाही. केवळ दिवाळीच्या काळातच ध्वनी व धुराचे प्रदूषण मोजले जाते.

- शहर वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने मोटार वाहन कायद्यातील तरतूुनुसार अशा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी लोकांकडून होते. मात्र, प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशी कारवाई होताना दिसत नाही. केवळ शहर वाहतूक शाखेनेच वर्षभरात ८१ जणांवर कारवाई केलेली आहे. दुचाकी, चारचाकी व रिक्षांनाही पोलीस सायरनसह इतर वेगळ्या प्रकारचे हॉर्न बसविण्याची क्रेझ वाढत चालली आहे.

Web Title: The sound of loud and musical horns and hands on everyone's ears ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.