एरंडोमध्ये दमदार पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:13 AM2021-06-29T04:13:19+5:302021-06-29T04:13:19+5:30
एरंडोल : तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मृग नक्षत्र त्याअर्थाने ...
एरंडोल : तालुक्यात यावर्षी मृग नक्षत्राच्या प्रारंभी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र मृग नक्षत्र त्याअर्थाने मृगजळ ठरले. जून महिना संपत आला तरीसुद्धा पेरणीलायक पाऊस अजूनही झाला नाही. त्यामुळे शेतकरी गोटात चिंता पसरली आहे.
काही जाणकार शेतकऱ्यांच्या मते गेल्या काही वर्षांपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून जोरदार पाऊस झाल्याने खरीप पेरण्या झाल्याचा प्रत्यय आला आहे. म्हणून चिंता करण्याचे कारण नाही.
एरंडोल तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ५९ हजार ७७१ हेक्टर इतके आहे. त्यापैकी ३९ हजार हेक्टर क्षेत्र लायक आहे. त्यातून २३ हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आहे.
कापूस लागवड पूर्ण झाली असली, तरी ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन या खरीप त्यांच्या पेरण्यालायक पाऊस न झाल्यामुळे लांबणीवर पडल्या आहेत. रोज पावसाळी वातावरण पाहिल्यावर आज नक्की पाऊस येईल, असे वाटत असताना प्रत्यक्षात वरुणराजा मात्र हुलकावणी देत आहे. त्यामुळे शेतकरी राजाचे तोंडचे पाणी पळाले आहे. यंदा मृगाची पेर होईल या आशेवर पाणी फिरले आहे.