जामनेर येथे युवकांच्या पुढाकारातून जागेचे सपाटीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 07:54 PM2019-12-11T19:54:17+5:302019-12-11T19:56:43+5:30
बिस्मिल्लानगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन आठवड्यात अहोरात्र काम करून कब्रस्तानातील खड्डे पडलेल्या टेकड्यासारख्या दोन एकर जागेचे सपाटीकरण केले व ती जागा पूर्णपणे कब्रस्तानसाठी मोकळी करून दिली.
सय्यद लियाकत
जामनेर, जि.जळगाव : येथील बिस्मिल्लानगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन आठवड्यात अहोरात्र काम करून कब्रस्तानातील खड्डे पडलेल्या टेकड्यासारख्या दोन एकर जागेचे सपाटीकरण केले व ती जागा पूर्णपणे कब्रस्तानसाठी मोकळी करून दिली. तसेच तीन वर्षांपूर्वी त्यांनी लावलेली सुमारे १५०हून अधिक झाडे जगली असून, पर्यावरण संवर्धनाचे ते एक उत्तम उदाहरण ठरत आहे.
सर्वत्र बेसुमार वृक्षतोड होऊन पर्यावरणाचा हास होत असल्याची ओरड होत असताना येथील बिस्मिल्लानगरमधील युवकांनी तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भागातील कब्रस्तानात विहिरीचे खोदकाम केले व या विहिरीला सुदैवाने पाणी चांगले लागल्याने त्याचा वापर करून या युवकांनी कब्रस्तानात १५० झाडे लावली. शासकीय योजनेनुसार केवळ झाडे लावून ते थांबले नाही तर त्यांनी दररोज झाडांना पाणी देऊन ती जगविली यासाठी त्यांनी संरक्षक जाळी लावून त्यांचे रक्षणही केले. आज हा परिसर वाढतअसलेल्या झाडांमुळे हिरवागार दिसत आहे. वाढलेल्या झाडाखाली सिमेंटच्या बाकांचीसुद्धा बैठकीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक फिरण्यासाठी येतात तेव्हा ते येथे विश्रांती करतात. या कामासाठी बुºहाण शेख, हारून खान, असलम खान, भिकन खान, जुबेर खान, अलमाश खान, परवेश शेख, रफीक शेख, राजा मिर्झा, अमीन शाह,वसीम शेख, कदीरशेख, यूनुस शेख, अमजद शेख आदींनी परिश्रम घेतले. या युवकांच्या या कामाचे नागरिक कौतुक करीत आहेत.
युवकांच्या या कामाचे नागरिक कौतुक करीत आहेत.
धर्माधिकारी प्रतिष्ठानने जगविली ९०० झाडे
जामनेरच्या नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी शहराजवळील टाकळी बुद्रूक गावात जि.प. प्राथमिक शाळेजवळ नऊ एकर मोकळ्या जागेत चार वर्षांपूर्वी एक हजार झाडे लावली. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने झाड़े जगविण्याचा प्रयत्न केला. झाडांना संरक्षक जाळ्या लावल्याने व नियमित पाणी दिल्याने झाडांची वाढ वेगाने होत आहे. वाढत्या तापमानापासून रक्षणासाठी झाडांना ग्रीन नेट लावण्यात आली. आज हा परिसर हिरवागार झाला असून, त्याचे सारे श्रेय प्रतिष्ठानच्या सदस्यांना आहे.
सोनबर्डी झाली हिरवीगार
माजी पालक मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा निधी खर्चून सोनबर्डीच्या विकासाला चालना दिली. या ठिकाणी बांधलेल्या सोमेश्वर महादेव मंदिरामुळे भाविकांची वर्दळ वाढली आहे. पालिका प्रशासनाने सोनबर्डी टेकडीवर वृक्ष लागवड करून परिसर हिरवागार झाला व आजूबाजूचे रस्ते केले असून, महिला-पुरुष मोठ्या संख्येने सकाळी व संध्याकाळी आता फिरायला जात आहेत.
एकीकडे रस्त्यावरील सावली हरवली
शहरातील मुख्य रस्त्यावरील डेरेदार जिवंत झाडांची तोड चौपदरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून ओरड होत आहे. तोडण्यात आलेल्या झाडांमुळे पर्यावरणाचा मोठा ºहास झाला आहे व रस्त्यावरची सावली हरवली आहे. वास्तविक बांधकाम विभाग व समाजिक वनीकरण विभागाने याकडे लक्ष देऊन शहरातील रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावून जगविली पाहिजे, अशी अपेक्षा आहे.