बोल... सदानंदाचा येळकोट...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:31 PM2019-12-02T12:31:18+5:302019-12-02T12:32:26+5:30
मार्गशीर्ष महिना भगवंतांची विभूती मानला जातो. ‘मासानां मार्गशीर्षोहं’ असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगूनच ठेवले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी ...
मार्गशीर्ष महिना भगवंतांची विभूती मानला जातो. ‘मासानां मार्गशीर्षोहं’ असे भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगूनच ठेवले आहे. मार्गशीर्ष प्रतिपदा ते षष्ठी असे सहा दिवस खंडोबाची नवरात्र असते. महाराष्ट्रात खंडोबा हे अनेकांचे कुलदैवत असून जेजुरी, निमगाव, पाली, नळदुर्ग आदी ठिकाणी खंडोबाची प्रसिध्द तीर्थक्षेत्रे आहेत. खंडोबाच्या नवरात्रात पाच दिवस उपवास करून तो सहाव्या दिवशी सोडतात. हा सहावा दिवस म्हणजे चंपाषष्ठीचा होय. याच दिवशी भगवान शंकराने मणि आणि मल्ल दैत्यांचा संहार केला. ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे उन्मत्त झालेल्या दैत्यांनी सज्जनांचा छळ करायला सुरुवात केली. त्यावेळी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करून दैत्याशी सहा दिवस युध्द केले. शेवटी मणि दैत्य शरण आला व मल्ल ठार झाला. त्याच्याच प्रार्थनेनुसार मार्तंड भैरवाने आपल्या नावापुढे त्याचे नाव लावून मल्ल+अरि (शत्रू) मल्लारी-मल्हारी असे नाव धारण केले.
चंपाषष्ठीला मल्हारी पूजनानंतर तालिका पूजन (तळीची पूजा) करतात. तळीतली भंडारा देवाला वाहतात व तळी उचलून खाली ठेवतात. बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. प्रसादाचा काही भाग श्वानांना दिला जातो. कारण कुत्र्याला खंडोबाचा अवतार मानतात. चंपाषष्ठी अशारितीने आपणास भूतदयेचा संदेश देते. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिते भगवंत’ हे भक्तीचे वर्म चंपाषष्ठी आपल्याला समजावते.
मणि आणि मल्ल हे दैत्य प्रत्यक्षात होते किंवा नाही, हे सांगता येणार नाही, पण आजही हे पैसा आणि दमन शक्तीच्या रुपात ‘मनी आणि मसल’ या रुपात अस्तित्वात आहेत. पैसा हा मणीचा तर गुंडगिरी हा मल्लाचा अवतार आहे. या दैत्यांचा उच्छाद आज सर्वत्र पहायला मिळतो आहे. सन्मार्गाने जीवन जगणे, या दैत्यांनी मुश्किल केले आहे. त्यांचा नि:पात करण्यासाठी तुमच्या माझ्यातला मल्हारी मार्तंड प्रकट झाला पाहिजे, हाच खरा चंपाषष्ठीचा संदेश आहे. गरीबाच्या ताटात भाजी - भाकरीचा नैवेद्य दररोज पडावा, कुणी उपाशी झोपू नये, भुकेलेल्यास अन्न मिळावे, तहानलेल्यास पाणी द्यावे, सर्वाभूती ईश्वर पहा. असे झाले तरच ‘सर्वेत्र सुखिन: सन्तु’ ही वेदांची प्रार्थना सार्थ होईल. त्याचदिवशी खऱ्या अर्थाने चंपाषष्ठीचे फळ प्राप्त होईल. त्याासाठी आपण संकल्प करू या...
- प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव.