जळगाव जिल्ह्यात ६८ मतदान केंद्रांवर असेल विशेष लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 11:44 AM2019-03-17T11:44:58+5:302019-03-17T11:46:21+5:30

संवेदनशिल केंद्र : प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर तयारी सुरु

Special attention will be given to 68 polling stations in Jalgaon district |  जळगाव जिल्ह्यात ६८ मतदान केंद्रांवर असेल विशेष लक्ष

 जळगाव जिल्ह्यात ६८ मतदान केंद्रांवर असेल विशेष लक्ष

Next
ठळक मुद्देमतदान केंद्रांचे सर्वेक्षण


जळगाव : यापूर्वी मतदान काळात ज्या मतदान केंद्रांवर गैरप्रकार तसेच बोगस मतदानाचे प्रकार झाले असतील असे ६८ मतदान केंद्र क्रिटीकल व सामाजिकदृष्टया संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर विशेष बंदोबस्ताचे नियोजन केले जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर प्रशासनातर्फे विविध पातळ्यांवर तयारीला वेग देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे विविध पातळ्यांवरील अधिकाऱ्यांच्या रोज बैठका घेत आहेत. तसेच मतदानाची प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडावी या दृष्टीनेही नियोजन करण्यात येत आहे.
मतदान केंद्रांचे सर्वेक्षण
ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक काळात केंद्र बळकावण्याचा प्रकार करणे, बोगस मतदान करणे, हाणामाऱ्यांचे प्रकार घडणे असे प्रकार घडल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्यास अशी मतदान केंद्र क्रिटीकल व सामाजिकदृष्ट्या संवेदनशिल म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या मतदान केंद्रांवर विशेष खबरदारी बाळगण्याचे नियोजन सुरू आहे. या संदर्भात मतदान केंद्रांचे पूर्वी घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण करून प्रशासनाने आपला अहवाल बनविला आहे.
विशेष बंदोबस्ताचे होणार नियोजन
अन्य मतदान केंद्रांच्या तुलनेत सामाजिकदृष्ट्या संवेदनशिल व क्रिटीकल मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त असेल. मतदान केंद्राच्या परिसरात ओळखपत्र असल्याशिवाय कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही. यासह केंद्रावर मतदान काळातील प्रत्येक क्षणाचे चित्रीकरण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुन्ह्यांच्या घटनांची दखल
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील पाच ठिकाणी निवडणूक कारणावरून वाद होऊन गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर गत दहा वर्षात १७ विविध गुन्हे या काळात दाखल आहेत याची नोंदही गांभीर्याने घेण्यात आली आहे.
अशी आहेत संवेदनशिल व क्रिटीकल केंद्र
लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय संवेदनशिल व क्रिटीकल केंद्र पुढील प्रमाणे आहे. जळगाव शहर मतदार संघ २ मतदान केंद्र, जळगाव ग्रामीण १०, अमळनेर १०, पाचोरा १ असे या लोकसभा मतदार संघात २३ मतदान केंद्र हे संवेदनशिल व क्रिटीकल असल्याची नोंद आहे. रावेर लोकसभा मतदार संघात चोपडा विधानसभा मतदार संघात ८, रावेर १९, भुसावळ १५, मुक्ताईनगर ३ एकूण ४५ मतदान केंद्र संवेदनशिल व क्रिटीकल आहेत. जिल्ह्यातील क्रिटीकल मतदान केंद्रांची संख्या २८ तर सामाजिकदृष्टया संवेदनशिल केंद्रांची संख्या ४० आहे.

Web Title: Special attention will be given to 68 polling stations in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.