शिक्षक मतदार संघच्या मतदानासाठी शिक्षकांना मिळणार विशेष नैमत्तिक रजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 11:54 AM2018-06-17T11:54:25+5:302018-06-17T11:54:25+5:30

विभागीय आयुक्त राजाराम माने यांची माहिती

Special educational leave for teacher voters | शिक्षक मतदार संघच्या मतदानासाठी शिक्षकांना मिळणार विशेष नैमत्तिक रजा

शिक्षक मतदार संघच्या मतदानासाठी शिक्षकांना मिळणार विशेष नैमत्तिक रजा

Next
ठळक मुद्देजळगावात घेतला आढावाफिरत्या पथकांसमवेत राहणार व्हिडिओग्राफर

जळगाव : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याकरीता मतदाराकडे निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या तेरापैकी कोणतेही एक छायाचित्र असलेले ओळखपत्र असणे आवश्यक आहे. त्यानुसार मतदानासाठी नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व संबंधित कर्मचाऱ्यांनी मतदार ओळखपत्र तपासण्याची दक्षता घ्यावी, असे निर्देश नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी दिले. या सोबतच सर्व शिक्षक मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी त्यांना विशेष नैमत्तिक रजा मंजूर करावी, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात माने यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद भामरे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार (निवडणूक) सुरेश थोरात यांच्यासह जिल्ह्यातील मतदान केंद्राध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त माने म्हणाले की, या निवडणुकीच्या मतदानासाठी वेळ वाढविण्यात आली असून आता मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार आहे. मतदानासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तिक रजा देण्याबाबत शिक्षण विभागाने तसे परिपत्रक काढून सर्व शैक्षणिक संस्थांना कळविण्यात यावे, सूक्ष्म निरीक्षक, भरारी पथकांबरोबरच पोलीस, परिवहन व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडतील याबाबत दक्ष राहण्याचे निर्देशही माने यांनी दिले. यावेळी त्यांनी निवडणूक प्रशिक्षण, मतपेटी, मतपत्रिका, मतदानासाठी उपलब्ध करून दिलेले कर्मचारी, त्यांचे प्रशिक्षण, वाहनव्यवस्थेसह इतर बाबींचाही सविस्तर आढावा घेतला.
फिरत्या पथकांसमवेत राहणार व्हिडिओग्राफर
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती दिली. निवडणुकीसाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून जिल्हास्तरावर आदर्श आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तालुकास्तरावर फिरती भरारी पथके गठित करण्यात आली असून या पथकांसमवेत व्हिडिओग्राफर राहणार आहे. मतदानासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी, सूक्ष्म निरीक्षक, सेक्टर आॅफिसर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
सर्वाधिक मतदार जळगाव तालुक्यात
२५ रोजी होणाºया या निवडणुकीसाठी जिल्ह्यात जळगाव तालुक्यात चार, चाळीसगाव, भुसावळ व अमळनेर तालुक्यात प्रत्येकी दोन तर धरणगाव, एरंडोल, पारोळा, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, पाचोरा, भडगाव या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २१ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण १२०५६ मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ९३६३ तर स्त्री मतदारांची संख्या २६९३ आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक २३८० मतदार जळगाव तालुक्यात असून त्यानंतर भुसावळ तालुक्यात १३६४, अमळनेर तालुक्यात १०३३ तर चाळीसगाव तालुक्यात ९९२ मतदार असल्याचे उपजिल्हाधिकारी भामरे यांनी सांगितले.

Web Title: Special educational leave for teacher voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.