विशेष उत्सव रेल्वे गाड्या ३१ मार्चपर्यंत धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:39+5:302021-01-08T04:49:39+5:30
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे दिवाळी आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष उत्सव गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या गाड्या ...
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे दिवाळी आणि नाताळच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या विशेष उत्सव गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. या गाड्या यंदा ३१ मार्चपर्यंत धावणार असून, जळगावला थांबा असणाऱ्या ६ सुपरफास्ट गाड्यांचा समावेश असल्यामुळे प्रवाशांच्या सोयीचे झाले आहे.
कोरोनानंतर ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करण्यात येत आहेत. दिवाळी व त्यानंतर नाताळच्या पार्श्वभूमीवर काही विशेष उत्सव रेल्वे गाड्या रेल्वेतर्फे सुरू करण्यात आल्या होत्या. या विशेष उत्सव गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याने, रेल्वेतर्फे या गाड्यांची मुदत वाढविण्यात आली आहे. यामध्ये जळगावला थांबा असलेल्या गाडी क्रमांक (०५०१७-१८) गोरखपूर-काशी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०२८२७-२८) दर रविवारी धावणारी पुरी-सुरत एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०८५०१) दर गुरुवारी धावणारी विशाखापट्टनम-गांधीधाम एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०८५०२) दर रविवारी धावणारी विशाखापट्टनम गांधीधाम एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०६०६७-६८) दर सोमवारी धावणारी चेन्नई-एग्मोर जोधपूर एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०६७३३-३४) दर शुक्रवारी धावणारी रामेश्वरम ओखा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक (०९०५७-५८) दर शुक्रवारी धावणारी उधना-मंडुआडीह एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश असून, या सर्व गाड्या ३१ मार्चपर्यंत धावणार आहेत.
आरक्षित तिकीट असणाऱ्यांनाच गाडीत प्रवेश
रेल्वे प्रशासनातर्फे या मुदत वाढविलेल्या विशेष उत्सव गाड्यांमध्येही जनरल तिकीट देण्याला बंदी घातली आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांचे तिकीट आरक्षित असेल, अशा प्रवाशांनाच गाडीमध्ये प्रवासासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. दरम्यान, या विशेष उत्सव गाड्यांनाही जनरल तिकीटद्वारे प्रवासाची सवलत नसल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.