जिल्हाधिका-यांच्या विशेष परवानगीने मोकळा झाला उपचाराचा मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 08:39 PM2021-03-04T20:39:59+5:302021-03-04T20:40:14+5:30
मातोश्री वृध्दाश्रमातील कोरोनाबाधितांना दिलासा : एकाच दिवसात आढळले १८ पॉझिटिव्ह
जळगाव : सावखेडा शिवारातील मातोश्री वृध्दाश्रमात कोरोनाने शिरकाव केला असून बुधवारी एकाच दिवसात वृध्दाश्रमात १८ जणांना कोरोनाची बाधा झाली. या वृध्दांकडे आधारकार्ड अथवा इतर कागदपत्रे नसल्याने उपचारासाठी अडचणी येत असताना सेवारथ परिवाराने पुढाकार घेत उपचारासाठी हालचाली केल्या. याविषयी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तात्काळ यंत्रणेला आवश्यक कागदपत्र उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या व या निराधारांना उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे यासाठी सावखेडा शिवारातील मातोश्री वृध्दाश्रमात अशा ज्येष्ठ नागरिकांना आधार दिला जातो़ वृध्दाश्रमात ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे वृध्द आहेत. सध्या कोरोना विषाणूने पुन्हा हातपाय पसरल्यानंतर जिल्ह्यासह जळगाव शहरात आता पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहे. वृध्दाश्रमातील वृध्दांनाही काहीसे लक्षणे जाणवू लागली. बुधवारी त्यांची खाजगी रूग्णालयात अॅन्टीजेन तपासणी केली गेली. आणि काही वेळातचं तपासणीचा अहवाल धडकला. वृध्दाश्रमातील तब्बल १८ वृध्द व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या. पण, त्यानंतर सर्वात मोठी अडचणी उभी राहिली ती उपचाराची. या निराधार ज्येष्ठांकडे ना आधारकार्ड ना इतर कुठलेही कागदपत्र नसल्यामुळे त्यांना उपचारासाठी अडचणी येऊ लागल्या. हा प्रकार डॉ. प्रताप जाधव यांना कळताच, त्यांनी त्यांच्या परिचयातील सेवारथ परिवारातील डॉ. रितेश पाटील यांनी कळविले. पाटील यांच्यासह सेवारथ परिवारातील डॉ. नीलिमा सेठीया, दिलीप गांधी व कवी कासार यांनी क्षणाचा विलंब न करता पुढाकार घेऊन उपचारासाठी हालचाली सुरू केल्या.
उपचारासाठी तात्काळ दाखला द्या...
निराधार वृध्दांकडे कुठलेही कागदपत्र नसल्यामुळे उपचार मिळण्यास अडचणी येत असल्याची बाब ही सेवारथ परिवारतील सदस्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दुपारी कळविली. बाधित वृध्द मंडळीना तात्काळ उपचार मिळावे म्हणून जिल्हाधिकारी यांनी तात्काळ तहसिलदार यांना संपर्क साधून उपचारासाठीचा दाखला देण्याच्या सूचना केल्या. तहसिलदारांनी दाखला तयार करून तो सेवारथ परिवाराकडे सोपविला. नंतर सेवारथ परिवारातील कवी कासार यांनी पाच रूग्णवाहिकांच्या माध्यमातून काहींना पॉलिटेक्निक येथे तर काही इकरा येथे उपचारार्थ हलविले.
बेड खाली नसल्यामुळे तासभर ताटकळले बाधित
बेड खाली नसल्यामुळे सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आवारात तासभर सहा ते सात बाधित वृध्द मंडळी ताटकळली. हा प्रकार डॉ. रितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना लक्षात आणून दिला. जिल्हाधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन गोदावरी रूग्णालयात बाधितांच्या उपचाराचा मार्ग मोकळा केला. गोदावरी रूग्णालयात बेड खाली असल्यामुळे रात्री उर्वरित बाधित वृध्दांना रूग्णवाहिकेतून हलविण्यात आले.