प्रतिकुलतेच्या काळोखातून उजळलेल्या कासोद्याच्या ‘दीपक’ला विशेष सेवा पोलीस पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 06:08 PM2019-03-27T18:08:48+5:302019-03-27T18:09:08+5:30
तीन जहाल नक्षलवाद्यांना केले अटक
कासोदा, एरंडोल- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पोलीस उप निरिक्षकपदी झेप घेतलेले येथील रहिवासी दीपक वारे यांना नक्षली भागातील कठीण व खडतर परिस्थितीत उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल राज्याच्या पोलीस महासंचालकांनी २७ मार्च रोजी विशेष सेवा पदक, रोख एक हजाराचे बक्षीस जाहीर केले आहे.
२७ मार्च रोजी राज्याचे पोलीस महासंचालक सु. कु.जयस्वाल यांनी नक्षली भागात विशेष सेवा बजावणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पदक व रोख रक्कम बक्षीस जाहीर करण्यात आले. त्यात दीपक वारे यांचे नाव आहे. दीपक वारे यांनी कर्तव्यावर असताना गॅरापत्ती ठाण्याच्या वडगाव हद्दीतील तीन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली होती. तसेच पुराळा हद्दीतील एका नक्षलवादी कुटुंबाचे मन परिवर्तन करून आत्मसमर्पण करण्यासाठी भाग पाडले होते. मालेवाडा, मरमा, हेटाळकसा रस्त्यावरील भूसुरुंग नष्ट करून जिवित हानीही त्यांनी टाळली होती. कर्तव्यावर असताना त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. अतिसंवेदनशील भागात वर्षभरापेक्षा जास्त काळ राहून कोणतीही जीवित व वित्त हानी होऊ दिली नाही, आदिवासींचे जनजागरण तसेच साड्या कपडे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून संबंध प्रस्थापित करण्यासह अनेकदा नक्षलवाद्यांशी प्रत्यक्ष चकमकी झाल्या, त्यात एकाला गंभीर दुखापत झाल्याची नोंद आहे. अशा उत्कृष्ट कामाची दखल घेत हे बक्षीस वारे यांना मिळाल्याने गावकऱ्यांकडून वारे यांचे कौतूक होत आहे. सुमारे साडेतीन वर्षे नक्षली भागात कर्तव्य बजावत असताना जिल्हा पोलीस प्रमुखांचेदेखील वीसच्यावर बक्षीसे दीपक वारे यांनी मिळविली आहेत. वारे हे हल्ली धुळे जिल्ह्यातील शिरपूर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.