पुरी- अजमेर दरम्यान विशेष रेल्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:38+5:302021-01-24T04:07:38+5:30
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे पुरी ते अजमेरदरम्यान (गाडी क्रमांक ०२०३७-३८) ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. दर ...
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे पुरी ते अजमेरदरम्यान (गाडी क्रमांक ०२०३७-३८) ही विशेष गाडी सुरू करण्यात आली आहे. दर सोमवारी व गुरुवारी ही गाडी धावणार असून, जळगाव स्टेशनवर या गाडीला थांबा देण्यात आला आहे. तसेच या गाडीसाठी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे आरोग्य धोक्यात
जळगाव : शहरातील जुना खेडी रस्त्यावरील विद्या नगरजवळ गटारीचे पाणी रस्त्यावर वाहून आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तक्रार करूनही, मनपातर्फे उपाययोजना न करण्यात आल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मनपाने ही समस्या सोडविण्याची मागणी प्रेमकुमार डापसे, महेंद्र श्रीवास्तव, संजय नारसळे,रमेश गुणकर, कैलास गुणकर, चेतन खडसे यांनी केली आहे.
दिव्यांग बांधवांना आज व्हीलचेअर वाटप
जळगाव : जळगाव जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनतर्फे जिल्ह्यातील ५१ दिव्यांग बांधवांना आ. रोहित पवार यांच्या हस्ते २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता शिवतीर्थ मैदान येथे व्हील चेअरचे वाटप करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष शंभू सोनवणे यांनी केले आहे.
खाद्यपदार्थ व्यावसायिकांमुळे वाहतूक कोंडी
जळगाव : शिवतीर्थ मैदानासमोर रस्त्यालगत दररोज सायंकाळी विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाडे लागत असल्यामुळे, दररोज वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिकांचे हे अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
अग्रवाल चौकात वाहतूक कोंडी
जळगाव : सध्या महामार्गाच्या सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक संथगतीने सुरू असून, परिणामी दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी उद्भवत आहे. यामुळे अग्रवाल चौकातून मु. जे. महाविद्यालयाकडे जाणाऱ्या विद्यार्थांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मनपा प्रशासनाने या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.