संतांचे संगती मनोमार्ग गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 12:33 PM2019-10-05T12:33:45+5:302019-10-05T12:34:29+5:30
आजच्या युगात प्रत्येक मनुष्य बेचैन आहे. मनुष्य सुखी होण्याऐवजी दु:खीच होत चालला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरेच चांगले वाईट ...
आजच्या युगात प्रत्येक मनुष्य बेचैन आहे. मनुष्य सुखी होण्याऐवजी दु:खीच होत चालला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात बरेच चांगले वाईट अनुभव येतात. चढ उतार येतात, मान-अपमानही होतो. यामुळे आपल्या मनावर एक प्रकारचे कुविचाराचे मळभ साठते ते घालवण्यासाठी, मनाला पवित्र, निर्मळ व सुंदर बनविण्यासाठी एकच उपाय म्हणजे सत्संग...! स्वर्गीय सुख प्राप्त होते फक्त सत्संगात. हो इथेच संतांचे अनमोल विचार ऐकायला मिळतात, ज्याप्रमाणे परिस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे, चंदनाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या साधारण वनस्पतीला चंदनाचा सुगंध यावा किंवा नदी सागराला मिळून सागर स्वरूप होऊन जावी त्याप्रमाणे सत्संगामध्ये सदगुरूंच्या स्पर्शाने जीवनाचे सोनं होत, मनाला एक नवसंजीवनी प्राप्त होते. सत्संग या शब्दाचा अर्थ होतो संताची संगत, सत्संग हे एक आध्यात्मिक मंदिर असून मानवी जीवनाला आत्मिक सुख देणारं एक ज्ञानाचं परिपूर्ण भांडार आहे. पुरातन काळापासून संतांनी अभंगवाणीतून, ग्रंथातून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी सत्संगाची महती गातात.
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात... संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे ।।
बाबा अवतारसिंहजी म्हणतात.
संगत मिळेल जर साधुची कलंक सारे होती दूर ।
संगत मिळेल जर साधुची मन आनंद होईल चूर ।
म्हणूनच संतांच्या संगतीमुळेच ब्रह्मज्ञान प्राप्त होते. म्हणतात संत, गुरू, परमात्मा तीनो बडे महान, संत मिलावे गुरूसे, गुरू मिलोवे राम...।
सत्संगामध्येच भक्त आणि भगवंत यांचे पवित्र नाते जोडण्याचे कार्य घडते. दानवाचे मानवात आणि मानवाचो देवात रूपांतर करण्याचे महत्वाचे कार्य सत्संग करते. मानवतेचा आधार, सुखी जीवनाचा मंत्र, आनंदाचे प्रफुल्लीत झालेली एक बाग, पुण्याची पुण्यभूमी, समाधानाचे मंदिर, विवेकाचा खजिना म्हणजे संतांची संगत.
संकलन - राजकुमार वाणी, ज्ञानप्रचारक, संत निरंकारी मंडळ, जळगाव.