अध्यात्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:32+5:302021-04-12T04:14:32+5:30
कुठलाही सण आला की, त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा ...
कुठलाही सण आला की, त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणाऱ्या धार्मिक कृतींची माहिती घेऊया.
अभ्यंगस्नान : अभ्यंगस्नान (मांगलिक स्नान) गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करण्यास सांगितले आहे. अभ्यंगस्नान करताना देशकालकथन करतात.
तोरण लावणे : स्नानानंतर आम्रपल्लवांची तोरणे सिद्ध करून प्रत्येक द्वाराशी लाल फुलांसहित बांधावी; कारण लाल रंग शुभदर्शक आहे.
पूजा : प्रथम नित्यकर्म देवपूजा करतात. ‘वर्षप्रतिपदेला महाशांती करायची असते. शांतीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाची पूजा करतात. कारण या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली. पूजेत त्याला दवणा वाहतात. नंतर होमहवन आणि ब्राह्मण तर्पण करतात. मग अनंत रूपांनी अवतीर्ण होणाऱ्या विष्णूची पूजा करतात. ‘नमस्ते बहुरूपाय विष्णवे नमः’ हा मंत्र म्हणून नमस्कार करतात. ही शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो, उत्पात घडत नाहीत, आयुष्य वाढते आणि धनधान्याची समृद्धी होते, असे सांगितले आहे. संवत्सर पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आयुष्यवृद्धी होते, सौभाग्याची वाढ होते आणि शांती लाभते. या दिवशी जो वार असेल, त्या वाराच्या देवतेचीही पूजा करतात.
गुढी उभारणे : या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून सूर्योेदयाच्या वेळी शास्त्रशुद्ध गुढी उभारली जाते.
दान : याचकांना अनेक प्रकारची दाने द्यावीत, उदा. पाणपोईद्वारा उदकदान. याने पितर संतुष्ट होतात. ‘धर्मदान’ हे सर्वश्रेष्ठ दान आहे, असे शास्त्र सांगते. सध्याच्या काळात धर्मशिक्षण देणे, ही काळाची आवश्यकता आहे.
पंचांगश्रवण : ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा ‘उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात वर्षफल श्रवण करतात. तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी लाभते, वाराच्या श्रवणाने आयुष्य वाढते, नक्षत्रश्रवणाने पापनाश होतो, योगश्रवणाने रोग जातो, करणश्रवणाने चिंतिले कार्य साधते. असे हे पंचांगश्रवणाचे उत्तम फल आहे. त्याच्या नित्य श्रवणाने गंगास्नानाचे फल मिळते.
कडुनिंबाचा प्रसाद : पंचांग श्रवणानंतर कडुनिंबाचा प्रसाद वाटायचा असतो. हा प्रसाद कडुनिंबाची पाने, जिरे, हिंग, भिजलेली चण्याची डाळ आणि मध यांपासून सिद्ध करतात.
भूमी (जमीन) नांगरणे : या दिवशी भूमीत नांगर धरावा. नांगरण्याच्या क्रियेने खालची माती वर येते. मातीच्या सूक्ष्म कणांवर प्रजापतिलहरींचा संस्कार होऊन बीज अंकुरण्याची भूमीची क्षमता अनेक पटींनी वाढते. शेतीची अवजार अन् बैल यांवर प्रजापती लहरी उत्पन्न करणाऱ्या मंत्रासह अक्षता टाकाव्या. शेतात काम करणाऱ्या माणसांना नवीन कपडे द्यावे. या दिवशी शेतात काम करणारी माणसे अन् बैल यांच्या भोजनात पिकलेला भोपळा, मुगाची डाळ, तांदूळ, पुरण इत्यादी पदार्थ असावेत.
सुखदायक कृत्ये : हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे सण म्हणजे ‘अधिकाधिक चैतन्य मिळवण्याचा दिवस’ असतो. त्यामुळे सणाच्या दिवशी सात्त्विक भोजन, सात्त्विक पोषाख तसेच अन्य धार्मिक कृत्ये इत्यादी करण्यासमवेतच सात्त्विक सुखदायी कृत्ये करण्यास शास्त्राने सांगितले आहे.
निरूपण : सद्गुरु नंदकुमार जाधव