महापौरपदाच्या निवडणुकीआधीच सत्ताधारी भाजपमध्ये फूट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:16+5:302021-03-15T04:16:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीआधीच सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडली असून, २७ नगरसेवक ...

A split in the ruling BJP even before the mayoral election? | महापौरपदाच्या निवडणुकीआधीच सत्ताधारी भाजपमध्ये फूट?

महापौरपदाच्या निवडणुकीआधीच सत्ताधारी भाजपमध्ये फूट?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापौर व उपमहापौरपदासाठी गुरुवारी होणाऱ्या निवडणुकीआधीच सत्ताधारी भाजपमध्ये उभी फूट पडली असून, २७ नगरसेवक सहलीला रवाना झाल्याची चर्चा आहे. सांगली महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही महापौरपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. हाच पॅटर्न जळगाव महापालिकेतही राबविण्याची तयारी शिवसेनेकडून करण्यात आली असल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेकडून २७ नगरसेवक फुटल्याचा दावा केला जात आहे, तर माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे १७ नगरसेवक गायब असल्याचे सांगत या फुटीवर शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान, नगरसेवक गायब असल्याची चर्चा सुरू होताच शिवसेना नगरसेवकांची बैठक होऊन सेनेकडून आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजाविण्यात आला आहे. नाराज नगरसेवकांपैकी काहींशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी आमची नाराजी पक्षावर नसून आमदार सुरेश भोळेंवर असल्याचे सांगितले.

महापौर व उपमहापौर पदावरून सत्ताधारी भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी वाढत जात होती. अखेर या गटबाजीचे रूपांतर फुटीत झाले असून, महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली असतानाच भाजपमध्ये फूट पडल्याने भाजपचे संकटमोचक असलेल्या गिरीश महाजन यांना हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे.

हे नगरसेवक झाले आहेत गायब

गायब झालेल्या नगरसेवकांमध्ये विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांचा समावेश असून, त्यांच्यासह कुलभूषण पाटील, नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, मनोज आहुजा, चेतन सनकत, ॲड. दिलीप पोकळे, धुडकू सपकाळे, रंजना सपकाळे, नगरसेविका प्रतिभा पाटील यांचे पती सुधीर पाटील, रेश्मा काळे यांचे पती कुंदन काळे यांच्यासह इतर नगरसेवकांचा समावेश आहे. मात्र एकूण किती नगरसेवक गायब आहेत, याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत. तसेच माजी महापौर ललित कोल्हे यांनीदेखील भाजपची साथ सोडल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. आमदार महाजन यांची भेट घेऊन त्यांना आपला निर्णय सांगितल्याचे स्पष्ट केले.

विमानतळावर गिरीश महाजन यांनी घेतली बैठक

या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक बालाणी लॉन्स येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता तातडीने बैठक बोलविण्यात आली होती. मात्र आमदार महाजन यांनाच उशीर झाल्याने ही बैठक रद्द होऊन, रात्री ८ वाजता विमानतळ येथे ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार सुरेश भोळे यांच्यासह नगरसेवक कैलास सोनवणे, सभागृह नेते ललित कोल्हे, गटनेते भगत बालाणी, डॉ.राधेश्याम चौधरी, नगरसेवक विशाल त्रिपाठी, डॉ.अश्विन सोनवणे, धीरज सोनवणे, अतुल हाडा, सदाशिव ढेकळे, सुरेश सोनवणे, चंद्रकांत कापसे, डॉ.चंद्रशेखर पाटील, शोभा बारी यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत गिरीश महाजन यांनी भाजपचाच महापौर होईल, असा दावादेखील केला आहे.

आमचे बंड पक्षाविरोधात नाही तर आमदार भोळेंविरोधात

गायब असलेल्या नगरसेवकांशी ‘लोकमत’ ने संपर्क साधला असता, सर्व नगरसेवकांनी आमचे बंड, आमची नाराजी भाजप पक्षाशी नसून, आमची नाराजी ही आमदार सुरेश भोळे यांच्याबद्दल असल्याचे सांगितले. गिरीश महाजन, महापौर भारती सोनवणे, खासदार उन्मेष पाटील यांच्याशीही आमची नाराजी नसून, आमदार भोळे यांनी जळगावकरांचा ज्या प्रमाणे भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत राहाण्यात आता अर्थ उरलेला नसल्याचे या नगरसेवकांनी सांगितले. ‘लोकमत’ ने किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, भरत कोळी व कुलभूषण पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली.

आम्ही पालकमंत्र्यांसोबत

गायब झालेल्या नगरसेवकांनी आपण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील फार्म हाउसवरून नगरसेवक मुंबईला रवाना झाल्याचीही माहिती नगरसेवकांनी दिली.

फुटीच्या संख्येवरून दावे-प्रतिदावे

१. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपचे २७ नगरसेवक गायब झाल्याचे सांगितले.

२. माजी मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे १७ नगरसेवक फुटल्याचे मान्य केले आहे.

३. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपचे २५ नगरसेवक फुटल्याचे सांगितले.

४. एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नगरसेवकांसह एमआयएमचे नगरसेवकदेखील सेनेसोबत आल्याचा दावा केला आहे.

५. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी २०पेक्षा अधिक नगरसेवक शिवसेनेसोबत असल्याचा दावा केला आहे.

फुटीच्या काय काय असू शकतात शक्यता

१. भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांकडून या बंडाचे कारण आमदार सुरेश भोळे यांच्या विरोधात असलेली नाराजी असल्याचे सांगितले आहे. मात्र, यामागे महापौरपद व उपमहापौरपदासाठी दबावतंत्राचे कारण असण्याची शक्यता आहे.

२. सांगली महापालिकेत ज्याप्रमाणे भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही महापौरपद राष्ट्रवादीने मिळविले. तोच पॅटर्न जळगाव महापालिकेत शिवसेना नेतृत्वाकडून राबविण्यात आल्याचीही चर्चा आहे. यासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवी झेंडी दिल्याचीही चर्चा मनपा व राजकीय वर्तुळात सुरू आहे.

३. माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्यानंतर भाजपमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती. सुनील खडके यांचा उपमहापौरपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे तेव्हाची फूट आता पाडली गेल्याचीही चर्चा आहे.

अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचे जे नगरसेवक फुटले आहेत, त्या नगरसेवकांवर आता पक्षविरोधी भूमिका घेतल्याने अपात्रतेची टांगती तलवार लटकण्याचीही शक्यता आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून व्हिप बजाविण्यात आला व पक्षविरोधी मतदान केल्यास या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई होण्याची शक्यता आहे. फुटीसाठी २/३ बहुमत आवश्यक होते. ५७ नगरसेवकांमधून ३८ नगरसेवक फुटले असतील, तर नगरसेवकांचा अपात्रतेपासून बचाव होऊ शकतो. मात्र राज्यातील सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा असेल तर अपात्रतेची कारवाई टाळत वेळ मारून नेता येते, याचीही उदाहरणेही आहेत. सांगली मनपातील बंडखोरांवर अद्याप कारवाई सुरू झालेेली नाही, तर अमळनेर पालिकेतील साहेबराव पाटील गटाच्या नगरसेवकांची साडेचार वर्ष उलटूनही अपात्रता झालेली नाही. त्यास स्थगिती मिळाली आहे.

एमआयएमचे नगरसेवकही सेनेसोबत?

भाजपच्या नगरसेवकांसोबत एमआयएमचे तीन नगरसेवकदेखील शिवसेनेसोबत असल्याची चर्चा आहे. याबाबत एमआयएमचे गटनेते रियाज बागवान यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

कोट..

भाजपचे २७ नगरसेवक भेटायला आले होते. त्यांनी त्यांची काही नाराजी व्यक्त केली आहे. पुढील घडामोडीदेखील लवकरच समोर येतील.

-गुलाबराव पाटील, पालकमंत्री

भाजपचे १७ नगरसेवक गायब असल्याची माहिती मिळत आहे. त्या नगरसेवकांनी स्वत:हून त्यांच्यावर अपात्रतेची कुऱ्हाड मारून घेतली आहे. यामुळे त्यांना यापुढील निवडणूकदेखील लढविता येणार नाही. नाराजी होती तर ती पक्षापुढे मांडण्याची गरज होती.

-गिरीश महाजन, आमदार, भाजप.

भाजपचे काही नगरसेवक गायब झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेत या नगरसेवकांसह शिवसेना व एमआयएम मिळून शिवसेनेचाच महापौर होणार आहे. भाजपचे २५ नगरसेवक गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.

-एकनाथ खडसे, माजी मंत्री

स्थायी समिती सभापती निवडीच्या वेळेसदेखील अशाचप्रकारे अफवा पसरविण्यात आल्या होत्या. मात्र, त्या अफवाच ठरल्या, आताही या अफवा असून, महापालिकेत भाजपचाच महापौर होणार.

-दीपक सूर्यवंशी, महानगरप्रमुख, भाजप

नगरसेवक गायब झाल्याबाबत अजून माहिती नाही. कोरोनातून बरा झाल्याने अद्याप याबाबतची माहिती घेतलेली नाही. मात्र, काही नगरसेवकांशी याबाबत चर्चा करणार. आमच्याकडे स्पष्ट बहुमत आहे.

-सुरेश भोळे, आमदार

Web Title: A split in the ruling BJP even before the mayoral election?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.