भरकटलेली तरुणाई अन् चिंतीत पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 11:17 AM2019-07-05T11:17:09+5:302019-07-05T11:21:17+5:30
मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश सपकाळे या तरुणाचा गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या आवारातच चॉपरने भोसकून खून झाला. या खूनातील मुख्य संशयित किरण हटकर व त्याचे पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. किरण हटकर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांविरुध्द पोलिसात साधी अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद नाही.
सुनील पाटील
जळगाव : मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश सपकाळे या तरुणाचा गेल्या आठवड्यात महाविद्यालयाच्या आवारातच चॉपरने भोसकून खून झाला. या खूनातील मुख्य संशयित किरण हटकर व त्याचे पाच साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. किरण हटकर याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाचीच आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या इतर पाच जणांविरुध्द पोलिसात साधी अदखलपात्र गुन्ह्याचीही नोंद नाही. त्यातील एक जण तर पोलीस कर्मचा-याचा मुलगा आहे. त्याला कायद्याची पूर्णपणे जाणीव आहे. किरण हटकर याला मुकेशची हत्या करायचीच नव्हती, त्याच्या निशाण्यावर दुसरा गुन्हेगार होता. असे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे.
रागाच्या भरात त्याच्याकडून खून झाला. मुकेशचा नसला तरी इतर कोणाचा तरी खून करण्याचा उद्देश होताच, हे त्यातून निष्पन्न होत आहे. त्याच्याजवळ असलेल्या चॉपरबाबत इतर त्याच्या मित्रांना माहिती होते की नाही हे त्यांनाच माहिती, मात्र घटनेच्या दिवशी किरणसोबत राहणे हेच या पाच तरुणांवर बेतलेले आहे. किरणच्या संगतीपासून लांब राहिले असते तर या पाच तरुणांवर खूनाचा व गुन्हेगारी डाग लागला नसता. या घटनेमुळे समाजात या तरुणांसह त्यांच्या पालकांची बदनामी झाली. ‘करतं कोण अन् भरतं कोण’ अशी स्थिती या प्रकरणात पाचही तरुण व त्यांच्या कुटुंबियांची झालेली आहे.
प्रत्येकाच्या घरची परिस्थिती जेमतेमच आहे. दोघांना तर वडील देखील नाही. त्यांच्या जन्मदातीवर काय प्रसंग बेतला असेल त्याची कल्पनाच न केलेली बरी. पोलिसांच्या रेकॉर्डवर आल्याने या सर्वांचे भवितव्य धोक्यातच आहे. सरकारी नोकरी असो कि इतर उद्योग, व्यवसाय करायचा असला तर त्यांन्या ‘चारित्र्य पडताळणी’ ला आता ब्रेक लागला आहे. कोणत्याही नोकरीस हे पाचही मुलं आजच अपात्र ठरले आहेत. आई, वडीलांनी त्यांच्यासाठी खूप मोठे स्वप्न पाहिले असतील, आता या स्वप्नांचाही चुराडा झालेला आहे. आपली मुलं काय करतात, ते कोणासोबत राहतात, महाविद्यालयात नियमित जातात का? हे पाहणे देखील पालकांचे कर्तव्य आहे. त्यांचे दुर्लक्ष झाल्याने अशा घटनांचा मोठा स्फोट होतो. एकुणच वाईट व्यक्तीच्या संगतीत राहिले तर त्याचे परिणाम वाईटच होतात हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.