महापालिकेतर्फे संकुलांमध्ये सॅनिटायझरची फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:15 AM2021-04-10T04:15:29+5:302021-04-10T04:15:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवारी महापालिकेतर्फे शहरातील विविध व्यापारी संकुलांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात येत आहे. अग्निशामन दलाच्या बंबांमधून सॅनिटायझर भरून शहरातील विविध भागात फवारणी करण्यात आली.
शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. तसेच जिल्हा प्रशासनाने बाजारातील गर्दी नियंत्रणात यावी म्हणून कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही शहरातील गर्दी कमी होताना दिसून येत नाही. बाजारपेठांमध्ये नागरिकांची वाढत जाणारी गर्दी व यामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळेच मनपा प्रशासनाकडून खबरदारी शहरातील मुख्य बाजारपेठसह, शहरातील व्यापारी संकुल, मुख्य रस्ते तसेच शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये शुक्रवारी अग्निशमन विभागाचा गाड्यांद्वारे शहरात ठिकठिकाणी फवारणी करण्यात आली. यासाठी महापालिका प्रशासनाकडून ४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहरातील उपनगर भागांमध्येदेखील फवारणीला सुरुवात करण्यात आली आहे.
हॉटस्पॉटमध्ये लक्ष केंद्रित करणार
शहरात कोराना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जात आहे. प्रशासनाकडून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी अनेक ठिकाणी प्रशासनाला अपयश येत आहे. महापालिका प्रशासनाकडून तब्बल महिनाभर उशिराने शहरात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यात आली ही फवारणी आधीच करण्याची गरज होती, असेही म्हटले जात आहे. तरी महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना फवारणी सुरू केली असल्याने, आताही कायमस्वरूपी सुरू ठेवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने आता शहरातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या भागांमध्ये लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन केले आहे. या भागात सातत्याने फवारणी सह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या याचा शोध घेण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक स्थापन केले आहेत.