वसंत मोहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 05:12 PM2019-04-08T17:12:46+5:302019-04-08T17:13:04+5:30
‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ललित या सदरात लिहिताहेत साहित्यिक प्रमोद पिवटे...
आकाशात संथ वाहणारं आभाळ एकाएकी दिसेनासं होतं आणि पहाटेच्या निरव शांततेला भंग करून कर्ण छेदणारा पण गोड असा कोकिळेचा सुरेल आवाज जेव्हा साखर झोप मोडून गुंजतो तेव्हाच वसंताची चाहुल लागते. अगदी पहाटेच्या गार मंद वाऱ्यात कुठेतरी शिळ घातल्यागत. हवेत मंद मंद सुगंध दरवळत येऊन मनास भुरळ पाडल्याशिवाय राहत नाही. कुठे गोठ्यातला गोहंबर माडावर अगदी दूरवर घुमत दूर दूर ठाव घेत जातो, तेव्हा वासरमणी उल्हासून वरवर येत जातो. रात्रीच्या गर्भातून जणू काही तो एक एक पैलू या भुतली आरास मांडत जन्म घेतो आणि साऱ्या सृष्टीला नवा आयाम देऊन जन्मास घालतो. लांडोरीच्या पदन्यासात रान सारं जागं होते आणि कुठे गावातल्या ललनेच्या पायातील पैजणं वाजायला लागतात. कुठे गोड कडेवरी घागर पाण्याची ठुमकत जाते तर कुठे ओल्या नाभीचा ठाव घेऊन पदर चुंबन घेतो. पाखरांची ओळ मध्येच भ्रमुनी इवल्या चोचींना भरवण्या घरटे सोडतात तेव्हा गलबलून जातो शिवार. वसंताच्या पानझडीत कुठेतरी बोडके झालेले शिवारात अधून-मधून लालबुंद केशराच्या फुलझड्या रंग उधळताना दिसतो तो पळस आणि मग उष्ण लहरी तरळतात मातीवर जणू नागिणीच्या तालावर. गावातला वड आणि पिंपळाने आच्छादलेला पार गजबजतो गावातील लोकांनी आणि इथंच सुख दुखाच्या सग्या सोयऱ्यांच्या कथा ऐकीवात येतात, यातच गावाचा मूळ इतिहास नव्या पिढीला उमगतो थंड थंड दाट साऊलीत. काकुडतीला आलेल्या शिवारात कुठे आंब्यांची दाट अमराई आणि या अमराईत पानांआड लपलेले पोपटी राघवराज, तर मध्येच एखाद्या फांदीवर घोंगावणाºया मधमाशांच पोळं कुठेतरी पाण्याचा शोध घेत निघालेलं. वाटेत भेटणाराही अदबीनं थांबून पायवाटेच्या वाटसरूला पाण्याचा एक मघ भरून तृप्त करणारा बळीराजा आणि तहानेने तृप्त झालेल्या वाटसरूला माहेरवासीणसारखा कुठे जायचं होतं पाहुणं म्हणून विचारणारा. किती किती सुखावह, आंबटगोड सरबताच्या तोडीला तोड. घरापुढच्या झाडावर पक्षी गुंजन करीत रहावं म्हणून टांगलेलं पाणपात्र. तसंच माहेरची आस लागलेली सासरवासीण कन्या. ‘केव्हा येईल मुºहाई माझा घेऊन घुंगरगाडी अन्केव्हा नेसेल मी माहेरची साडी. घेऊन गिरकी, केव्हा गाईल सई संगे गाणी’. अशा पश्चिमेच्या संध्येला पिवळ्या केशरी नारंगी छटांची वर्खरी लोभस मनमोहिनी जणू वाट पाहते कुणी एक साजणी. म्हणूनच याच सम सखी एकमेकींच्या डोळ्यास विचारती होते. ‘सई सांगते कानात, आगळा यंदा आयाजीचा सण. किती हर्षोल्हासित वसंत, पिवळ्या हातावर मेंधीचे कोंदण, देवा भेटू दे पुन्हा याच अंगणी, एका सईचं एवढंच मागणं. पुन्हा केव्हा येईल जीवनी नांदाया असाच वसंत...
-प्रमोद पिवटे, मुक्ताईनगर, जि.जळगाव