एसपींचा धाडसी निर्णय अन् महानिरीक्षकांची कौतुकाची थाप !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:29+5:302021-03-25T04:16:29+5:30
सुनील पाटील एसपींचा धाडसी निर्णय अन् महानिरीक्षकांची कौतुकाची थाप! गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस दलात ...
सुनील पाटील
एसपींचा धाडसी निर्णय अन् महानिरीक्षकांची कौतुकाची थाप!
गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पोलीस दलात अनुकंपा तत्त्वावर प्रतीक्षा यादीत असलेल्या ६८ पोलीस पाल्यांना थेट सेवेत सामावून घेतले आहे, त्याशिवाय कोरोनाशी दोन हात करताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या पाल्यांनाही तत्काळ सेवेत सामावून घेतले. पाल्यांना विनाअडथळे नोकरी हीच दिवंगत पोलीस कर्मचाऱ्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरली आहे.
कोरोनाच्या संकट काळात इतक्या मोठ्या संख्येने अनुकंपा तत्त्वावर पोलीस पाल्यांना नोकरीत सामावून घेणारे डॉ. प्रवीण मुंढे महाराष्ट्रातील पहिलेच एस.पी.ठरले आहेत. खुद्द विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनीच जळगावात येऊन हे जाहीरपणे सांगितले. अवघ्या तीन दिवसात संपूर्ण प्रक्रिया पार पडून दिघावकर यांच्या हस्ते या पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्याआधीदेखील डॉ. मुंढे यांनी सेवानिवृत्तीच्याच दिवशी निरोप समारंभात एका हवालदाराला पदोन्नती बहाल केली होती. वेगवेगळ्या कारणांनी ठपके ठेवलेले किंवा निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्त तथा आदराची ताकीद देऊन पुन्हा कामावर रुजू करून घेतले. ''सरकारी काम आणि सहा महिने थांब'' अशी म्हण आपल्याकडे प्रचलित झालेली आहे. मुंडे यांनी मात्र छेद देऊन एक आगळावेगळा कामाचा ठसा उमटवलेला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पोलीस परिवारात मात्र निश्चितच आदराचे व पालकत्वाचे स्थान निर्माण झालेले आहेत. दरम्यान, पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी करीत असलेले कार्य नक्कीच प्रेरणादायी तसेच कौतुकास्पद आहे. आंतरजिल्हा बदलीचेही अनेक कर्मचारी वेटिंगवर आहेत. त्याशिवाय वैद्यकीय बिलांनाही कार्यालयीन बाबूंकडून ब्रेक लावला जात असल्याची ओरड आहे. या दोन्ही प्रश्नांना डॉ. मुंढे यांनी स्पर्श करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.