दुहेरी खून प्रकरणात पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:14 AM2021-04-26T04:14:22+5:302021-04-26T04:14:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तालुक्यातील कुसुंबा येथे ओम साई नगरात मुरलीधर राजाराम पाटील व त्यांची पत्नी आशाबाई मुरलीधर पाटील या दाम्पत्याच्या खून प्रकरणात एमआयडीसी पोलिसांचे एक पथक सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, मुरलीधर पाटीलच्या ब्रोकरकडे कामाला होते. त्या प्रकारची सलग तीन दिवसांपासून झाडाझडती सुरू आहे. त्याच्या भोवतीच बहुतांश तपास फिरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
पोलिसांनी संशयावरुन आधी १८ जणांची वेगवेगळी चौकशी केली. रविवारीदेखील आठ जणांची चौकशी करण्यात आली. या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखादेखील रात्रंदिवस कामाला लागलेली आहे. प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या दिशेने तपास करीत आहे. या खून प्रकरणात ओळखीच्या व्यक्तिचा सहभाग असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. घटना घडल्याच्या दिवसापासून या परिसरात कोणा कोणाचा वावर होता. याचीदेखील माहिती काढली जात आहे. त्यासाठी खास तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. श्वानपथक व फॉरेन्सिक पथक या दोघांचीही मदत घेतली जात आहे. आशाबाई पाटील यांचा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय असला तरी या घटनेशी त्याचा कितपत संबंध आहे, याचीदेखील रविवारी पडताळणी करण्यात आली. या दाम्पत्याने कोणा-कोणाला किती रुपये व्याजाने दिलेले आहेत, कोणाचे पैसे परत मिळालेले आहेत, कोणाकडे किती बाकी आहे ? याचीही माहिती काढायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोळा या गावात काहीतरी धागे-दोरे मिळू शकतील, असा अंदाज किंबहुना तशी खात्री झाल्यानेच एक पथक त्याची पडताळणी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात रवाना झालेले आहे. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तीन दिवसांपासून कुसुंबा व एमआयडीसी पोलीस ठाण्यात ठाण मांडले आहे. रविवारी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनीदेखील या भागात जाऊन काही लोकांची चौकशी केली. मुरलीधर पाटील यांचे घर गावाच्या अगदी शेवटी असल्याने तेथे नेमका कोणाचा वावर होता, हे कोणी सांगायला तयार नाही. या घराला लागूनच शेत शिवार आहे. त्यामुळे मारेकऱ्यांना पळायला हा मार्ग सोपा होता.
संशय असलेल्या व्यक्तिचा मोबाईल बंद
पोलिसांनी बुधवारी सायंकाळपासून या भागात येणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. एकाच ठिकाणी कॅमेरे आहेत. मात्र, तेथून काहीच हाती लागले नाही. ज्या व्यक्तींवर संशय आहे. त्या व्यक्तिचा घटनेच्या दिवशी या भागातून वावर झाला आहे का? याचेही फुटेज तपासले जात असून, मोबाईलबाबत माहिती घेतली जात आहे. दरम्यान, ज्या व्यक्तीवर संशय होता, त्यापैकी एकाचा मोबाईल घटनेच्या दिवसापासून बंद येत आहे. त्यामुळे त्याच्यावर अधिक संशय बळावला आहे.