भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री गुरुदेव दत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 01:42 AM2018-11-28T01:42:46+5:302018-11-28T01:43:43+5:30
भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या साकेगाव येथील श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे साकेगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या साकेगाव येथील श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे साकेगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
हजारो वर्षापूर्वी श्री आश्रम ऋषी महाराज यांची समाधी असून याठिकाणी सन १९८६ साली दत्तमंदिर बांधकामाला सुरुवात होऊन सन १९८८ साली मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. वर्षानुवर्षेपासून दत्त जयंती पौर्णिमा गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात येते. दत्तजयंतीला सकाळी महापूजा, होमपूजन, दुपारी आरती व दिवसभर महाभंडारा आयोजित केला जातो. जागृत देवस्थान असल्याने हजारो भाविक या ठिकाणी येत असतात वर्षभरात हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. सप्टेंबर २०१७ ला ग्रामसभेत ठराव होऊन मंदिराला तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव जि.प. जळगावला सादर करण्यात आला होता.
१ जानेवारी २०१८ रोजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांनी शिफारस पत्र देऊन याचा पाठपुरावा केला. ३ आॅक्टोबर २०१८ च्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा विषय मंजूर होऊन गुरुदेव दत्त मंदिराला दर्जा मिळाला आहे. पाठपुरावा केल्यामुळे दत्तमंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत 'क' दर्जा प्राप्त झाल्याने याकामी गावातील नागरिक भाविक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सहकार्य मिळाल्याने याचा पाठपुरावा यशस्वी पाठपुरावा केल्याचे जिल्हा परिषद सदस्य तथा भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. दरम्यान, २२ डिसेंबरला साजरी होणारी दत्तजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.