अमळनेर येथील संत सखाराम महाराजांच्या दिंडिचे पंढरपूरकडे प्रस्थान
By Admin | Published: June 10, 2017 01:41 PM2017-06-10T13:41:39+5:302017-06-10T13:41:39+5:30
संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या पायी वारीचे शनिवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी तुळशीबागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले
अमळनेर, जि. जळगाव, दि. 10 - संत सखाराम महाराज आणि विठू नामाचा जयघोष करीत अमळनेर येथील संत सखाराम महाराज विठ्ठल-रुख्मिणी संस्थानच्या पायी वारीचे शनिवारी दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी तुळशीबागेतून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. वारक:यांना निरोप देण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती .
पायी वारीत सहभागी होण्यासाठी वारक:यांची सकाळपासूनच वाडी व तुळशीबागेत गर्दी झाली होती. सकाळपासून या परिसरात टाळ-मृदुंगाचा गजर निनादू लागला होता. सकाळी वाडी संस्थानातून गादीपती प्रसाद महाराज पैलाडमधील वाडी संस्थानच्या तुळशीबागेत आले. याठिकाणी त्यांच्याहस्ते विठ्ठलाच्या मूर्तीला तुळशीपत्र अर्पण करण्यात आले.
पूजा झाल्यानंतर प्रसाद महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. भाविकांच्या सोयीसाठी मोठा शामियाना उभारण्यात आला होता. ओसरीवर बसून प्रसाद महाराज भाविकांना खडीसाखरेचा प्रसाद व आशीर्वाद दिले. पायी दिंडी निघण्याची वेळ जसजशी जवळ येत होती, तसतशी भाविकांची तुळशीबागेत गर्दी वाढू लागली होती .
शुभ्र कपडे, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात तुळशी माळ, खांद्यावर भगवा ध्वज व मुखी विठ्ठलाचा जप करीत वारकरी पंढरपूरकडे जाण्यासाठी सज्ज झाले होते. यावेळी ढोलताशांच्या तालावर महिला वारक:यांनी रिंगण करून ठेका घेतला. त्यामुळे उत्साहात आधिकच भर पडली.
दुपारी ठीक 12.10 वाजता आरती झाली. प्रसाद महाराजांनी भाविकांना आशीर्वाद देताच पुन्हा एकदा संत सखाराम महाराजांचा जयजयकार करण्यात आला. त्यानंतर प्रसाद महाराज पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. दिंडित आमळनेरसह परिसरातील भाविक मोठया संख्येने सहभागी झाले. महाराजांसोबत पारोळ्यापयर्ंत जाणा:या भाविकांची संख्या 500 पेक्षा अधिक होती .