जळगाव येथे श्रीरामजन्मोत्सव सोहळ्य़ाचा अपूर्व उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:03 PM2018-03-25T13:03:48+5:302018-03-25T13:11:56+5:30
प्रभू श्रीरामाच्या जयघोषणानी दुमदुमली जळगावनगरी
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 25 - ‘सियावर रामचंद्र की जय’चा एकच जयघोष अन् ‘राम जन्मला गं सखी राम जन्मला’ म्हणत रामजन्माचा दिव्यसोहळा रविवारी दुपारी जळगाव येथे मंदिरांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी अबालवृद्धांनी प्रचंड गर्दी केली होती.
श्रीराम नवमीनिमित्त शहरातील श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. मंदिरांमधून टाळ-मृदुंगाचे मंगल सूर ऐकू येत होते. जुने जळगाव परिसरातील श्रीराम मंदिर व नवीन बसस्थानक परिसरातील चिमुकले राममंदिरासह इतर मंदिरांमध्ये भक्तीमय वातावरण होते.
जुन्या गावात भाविकांची प्रचंड गर्दी
जळगावचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानात राम नवमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राम मंदिरात रामनवमी निमित्त रामसेतूची शिळा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. तिचे दर्शन करण्यासाठीही गर्दी झाली होती. पहाटे ४ वाजता भजन, काकडा आरती, महाभिषेक तसेच सकाळी ७ वाजता मंगल आरती, साडेदहा वाजता गंगाधर महाराज यांचे कीर्तन होऊन दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टीने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
२२२
चिमुकले राम मंदिरात राम नामाचा गजर
शहरातील मध्यवर्ती भागातील नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राम मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त सकाळी साडेपाच वाजता मंगल आरती, ६ वाजता अभिषेक, साडेसात वाजता आरती, सकाळी १० वाजता हभप दादा महाराज यांचे रामजन्मावर कीर्तन झाले तर ‘पुरोहितांची परंपरा’ या विषयावर ऋषीकेश जोशी, राजेश जोशी, हेमंत धर्माधिकारी यांचे कीर्तन झाले. त्यानंतर दुपारी १२ वाजता जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याहस्ते आरती झाली. या वेळी भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्रीराम जन्मोत्सवानंतर पाळण्यातील श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीरामाचे दर्शन घेऊन भाविकांनी दादा महाराज जोशी यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी आमदार सुरेश भोळे यांनीही भेट देऊन दर्शन घेतले.
श्रीराम जन्मोत्सवासाठी मंदिरात केळीचे खांब, आंब्याच्या पानांचे तोरण, फुलांच्या माळा व आकर्षक रोशणाईने मंदिर सजवण्यात आले होते. पाळण्याला पान, फुलं, फुगे, यांनी सजविण्यात आले होते. शहरातील अनेक महिला-पुरुष भाविकांनी रामजन्मोत्सवासाठी मंदिरात सकाळी ११ वाजेपासून गर्दी केली होती व राम नामाचा गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला होता. जन्मोत्सवानंतर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.