बेस्ट सेवेतून एस.टी. कर्मचाऱ्यांना वगळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:15 AM2021-03-22T04:15:21+5:302021-03-22T04:15:21+5:30
आमदारांची मागणी : कोरोना लस देण्याचीही मागणी जळगाव : जळगावसह विविध आगारातून एस. टी. कर्मचारी मुंबई येथे दर ...
आमदारांची मागणी : कोरोना लस देण्याचीही मागणी
जळगाव : जळगावसह विविध आगारातून एस. टी. कर्मचारी मुंबई येथे दर आठवड्याला बेस्टला सेवा देण्यासाठी जात आहेत. मात्र हे कर्मचारी गावाकडे परतल्यावर कोरोना संसर्ग वाढण्याची भीती निर्माण होत आहे.त्यामुळे जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना बेस्ट सेवेतून वगळण्याची मागणी आमदार सुरेश भोळे व आमदार मंगेश चव्हाण यांनी जिल्हाधिकारी व विभाग नियंत्रक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एस. टी. कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचीही मागणी केली आहे.
सध्या कोरोना काळातही एसटी महामंडळातील कर्मचारी नियमित सेवा देण्यासाठी कामावर येत आहेत. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणही झाली आहे. तसेच या कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्या पासून मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात येत आहे. मात्र, मुंबईहुन परतल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कोरोनाची भीती होण्याची शक्यता असून, यामुळे जिल्ह्यात कोरोना पसरण्याचीही शक्यता निर्माण होत आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेतून वगळण्याची मागणी या आमदारांनी केली आहे.
तसेच मुंबईला सेवा न देण्याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमधून विरोधही होत आहे. कर्मचाऱ्यांच्या या मागण्यांबाबत जळगाव विभागातील संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी राकेश पाटील, प्रताप सोनवणे व पाळ पाटील यांनी आमदार सुरेश भोळे व मंगेश चव्हाण यांची भेटही घेतली होती.