दुचाकी चोरीला गेल्यानं आत्महत्या केली अन् अवघ्या काही वेळात दुचाकी सापडली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 09:33 PM2020-09-12T21:33:00+5:302020-09-12T21:33:35+5:30

रेल्वेसमोर झोकून देत एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

st employee committed suicide by thinking his bike taken by thief | दुचाकी चोरीला गेल्यानं आत्महत्या केली अन् अवघ्या काही वेळात दुचाकी सापडली

दुचाकी चोरीला गेल्यानं आत्महत्या केली अन् अवघ्या काही वेळात दुचाकी सापडली

Next

जळगाव: दुचाकी चोरी गेल्याने घरी काय उत्तर द्यायचे या विंवचनेत अडकलेल्या विजय छगन अहिरे (४९ रा.श्रध्दा कॉलनी) यांनी रेल्वेच्या समोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी ३.१५ वाजता महामार्गावरील शिव कॉलनी उड्डाणपुलाजवळ अप रेल्वेलाईनवर घडली. दरम्यान, आपली समजून नजरचुकीने ही दुचाकी घेऊन गेलेल्या व्यक्तीने ही दुचाकी रामानंद नगर पोलिसात आणून दिल्याचे उघड झाले.

विजय अहिरे एस.टी. वर्कशॉपमध्ये नोकरीला होते. शनिवारी दुपारी अहिरे हे कामासाठी घरुन गिरणा टाकीजवळील चौकात आले. याठिकाणी त्यांची दुचाकी उभी केली. काम आटोपून झाल्यावर अहिरे हे दुचाकीजवळ आले, असता त्यांना त्यांची दुचाकी आढळून आली नाही. यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला. मात्र मिळून आली नाही. दुचाकी चोरी गेल्याने पत्नीसह मुलांना काय उत्तर द्यावे, काय सांगायचे या विवंचनेत अहिरे यांनी शिवकॉलनी उड्डाणपूलाजवळ रेल्वेलाईन गाठली. शिरसोली जळगाव अपलाईनवरील खांबा क्रमांक ४१७/२६/२६ याठिकाणी येणाऱ्या रेल्वेगाडीसमोर झोकून देत आत्महत्या केली.

अनोळखी व्यक्ती नजरचुकीने घेऊन गेला होता दुचाकी
विजय अहिरे यांच्या दुचाकीप्रमाणे एकाच रंगाची व कंपनीची दुचाकी त्यांच्या दुचाकीशेजारी उभी होती. अनोळखी व्यक्तीने आपलीच दुचाकी समजून अहिरे यांच्या दुचाकीला चावी लावली, विशेष म्हणजे ही दुचाकी सुरूदेखील झाली. यानंतर अनोळखी व्यक्तीला आपण आणलेली दुचाकी आपली नसल्याने क्रमांकावरुन लक्षात आले. त्यानंतर संबंधित तरुणाने थेट दुचाकी रामानंदनगर पोलीस ठाण्यात आणून दिली. विजय अहिरे हे घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने चुलतभाऊ कल्पेश अहिरे यास कळविले. कल्पेश नशिराबादहून थेट रामानंदनगर पोलीस ठाण्यात पोहचला. याठिकाणी त्याने विचारणा केली, असता तोपर्यंत पोलिसांना रेल्वेरुळावर आत्महत्या केल्याचे कळाले. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज इंद्रेकर यांच्यासह राजेश भावसार यांनी कल्पेशसह घटनास्थळ गाठले असता, कपडे, चप्पल तसेच खिशातील पाकिट व त्यातील कागदपत्रावरुन ते आपलेच काका विजय अहिरे असल्याचे लक्षात आले.

दुचाकी मिळाली; पण जीव गेला!
घटनास्थळी दुचाकी नसल्याने कल्पेशने पोलिसांना विचारणा केली असता, सांयकाळी एक तरुण दुचाकी लावून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस ठाण्यात आले असता, दुचाकी ही विजय अहिरे यांचीच असल्याचे निष्पन्न झाले. दुचाकी चोरीस गेल्याच्या तणावात काका विजय अहिरे यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती त्यांचा पुतण्या कल्पेश अहिरे याने पत्रकारांना दिली. अहिरे यांच्या पश्चात पत्नी निता, मुलगा स्वप्निल,मुलगी प्रियंका असा परिवार आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

Web Title: st employee committed suicide by thinking his bike taken by thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.