एस.टी. कर्मचाऱ्यांनी अंत पाहु नये - अजित पवार यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 01:58 PM2021-12-17T13:58:13+5:302021-12-17T13:58:21+5:30
जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत ...
जळगाव : राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यांना शेजारच्या राज्यांप्रमाणेच मानधन मिळते. एस.टी.चे शासनात विलनीकरण करण्यासाठी समिती गठीत आहे. त्या समितीचा अहवाल येत नाही. तोपर्यंत त्यावर निर्णय होऊ शकत नाही. त्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी आता टोकाची भुमिका घ्यायला लावु नये, आता सहनशिलता संपण्याची वेळ आली असून त्यांनी कामाला सुरूवात करावी,अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपकऱ्यांना इशारा दिला आहे.
उपमुख्यंत्री अजित पवार हे शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले की, राज्यात एस.टी कर्मचाऱ्यांच्या मानधन आणि वेतनात वाढ करण्यात आली आहे.. मात्र जर नवीन भरती सुरू झाली तर काय होईल, याचा विचार संपकऱ्यांनी करावा. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार वेळच्या वेळी होतील, असा शब्द देखील देण्यात आला आहे. आता कर्मचाऱ्यांनी देखील समंजस भुमिका घ्यावी, असेही पवार म्हणाले.
कर्जमाफीवर ते म्हणाले की, नियमीत कर्ज भरणाऱ्यांना आणि दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. मात्र कोविडची परिस्थिती निवळल्यावर आणि सरकारची आर्थिकस्थिती पुर्वपदावर आल्यावर त्यावर निर्णय घेतला जाईल.’
ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावर पवार यांनी सांगितले की, ५४ टक्के वर्गाला वंचित ठेवणे हे योग्य नाही. ३ महिन्यात जनगणना करु. त्यासाठी ओबीसी आयोगाला निधी दिला जाईल. एप्रिल किंवा मे मध्ये निवडणुका होऊ शकतात. तसेच मागासवर्गिय आयोगाला आवश्यक निधी तातडीने दिला आहे. उर्वरीत पुरवणी मागण्यांसाठी विधी मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे.’
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार म्हणाले की, शेतकऱ्यांना महावितरणची फक्त चालु थकबाकी भरायची आहे. त्यांचे कनेक्शन तोडले जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील पानमळ्यांच्या नुकसानीबद्दल लवकरच चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.