एसटी अडकली 'अमृत'च्या खड्डयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 01:16 PM2019-08-10T13:16:19+5:302019-08-10T13:19:14+5:30
बिकट वाट : सुदैवाने प्रवासी बचावले: शिवाजीनगर रस्त्यावरील घटना
जळगाव : शहरात रस्त्यांवर जागो-जागी खड्डे पडले आहेत. पावसामुळे या खड्डयांमध्ये पाणी साचत असल्यामुळे खड्डे किती खोल याचा अंदाज येत नाही. यामुळे शुक्रवारी सकाळी शिवाजीनगरातून जात असलेल्या रस्त्यावर अमृतचे काम झाल्यामुळे पडलेल्या रस्त्यावर चोपडा-जळगाव एसटीबस अचानक फसल्याची घटना घडली़ सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही़
चालकाचे प्रसंगावधान
जळगाव आगाराची बस (क्र. एम एच ४० वाय ५१९३) शुक्रवारी चोपड्याहून जळगावच्या दिशेने यायला निघाली. गाडीमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांसह ३० ते ४० प्रवासी होते. जळगावच्या दिशेने येत असताना ही बस माजी मंत्री सुरेशदादाच्या घरासमोर अमृतचे काम सुरु असलेल्या खड्डयात फसली. अर्ध्याच्या वर चाक खाली गेल्याने, बसचा तोल पूर्ण डाव्या बाजूला गेला होता.
यावेळी चालक एस. एस. बोदडे आणि वाहक एम. आर. अडकमोल यांनी तात्काळ प्रवाशांना खाली उतरविले. तासाभराने क्रेनच्या मदतीने बस बाहेर काढण्यात आली. त्यानंतर ती पुढे मार्गस्थ झाली़