एस.टी. महामंडळ व महावितरण कार्यालयात आदेशाची अंमलबजावणी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:16 AM2021-04-08T04:16:35+5:302021-04-08T04:16:35+5:30
या आदेशानुसार शासकीय कार्यलयांमधील अंमलबजावणीबाबत लोकमत प्रतिनिधीने बुधवारी शहरातील एस. टी. महामंडळाचे प्रशासकीय कार्यालय व दीक्षितवाडी येथील महावितरणच्या कार्यालयाची ...
या आदेशानुसार शासकीय कार्यलयांमधील अंमलबजावणीबाबत लोकमत प्रतिनिधीने बुधवारी शहरातील एस. टी. महामंडळाचे प्रशासकीय कार्यालय व दीक्षितवाडी येथील महावितरणच्या कार्यालयाची पाहणी केली. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे कुठलेही पालन होतांना दिसून आले नाही. महामंडळाच्या कार्यालयात कामानिमित्त बाहेरील कर्मचारी व काही प्रवाशांची गर्दी दिसून आली. विभाग नियंत्रकांच्या दालन समोर अधूनमधून नागरिकांची ये-जा सुरू असलेली दिसून आली. तसेच या ठिकाणी प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर अभ्यागतांना ३० एप्रिल पर्यंत प्रवेशाला बंदी असल्याबाबत कुठलीही नोटीस किंवा आदेश लावण्यात आलेला दिसून आला नाही. या बाबत तेथील प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कामानिमित्ताने येणाऱ्या प्रवाशांची गर्दी असल्याचे सांगितले.
महावितरण कार्यालय
महावितरणच्या कार्यालयात पाहणी केली असता, या ठिकाणी ५० टक्केच कर्मचाऱ्यांची संख्या दिसून आली. मात्र, वीज बिलाच्या कामानिमित्त बाहेरून येणाऱ्या नागरिकांची ये-जा सुरूच असलेली दिसून आली. तसेच या ठिकाणीही प्रवेशाबाबत कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर कुठलीही सूचना किंवा नोटीस लावण्यात आलेली दिसून आली नाही. याबाबत शहराचे प्रभारी कार्यकारी अभियंता ए. बी. चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता, होऊ शकला नाही.