रॅम्पवर उभी एसटी अचानक धावली..! जळगाव डेपोतील प्रकाराने धावपळ; तीन गाड्यांना जोरदार धडक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 07:31 IST2024-12-14T07:31:09+5:302024-12-14T07:31:19+5:30
एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीसह फिटनेसचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

रॅम्पवर उभी एसटी अचानक धावली..! जळगाव डेपोतील प्रकाराने धावपळ; तीन गाड्यांना जोरदार धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : नाशिक येथील बस स्थानकामध्ये ई-बस अचानक सुरू झाल्याने एका महिला प्रवाशाला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असताना जळगाव बस स्थानकातील डेपोमध्ये शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाहन दुरुस्तीच्या रॅम्पवर उभी असलेल्या एसटीचा हॅन्ड ब्रेक खराब झाल्याने बस थेट आगार प्रमुखाच्या कार्यालयाकडे धावत सुटली. या घटनेत विभागनियंत्रकांच्या गाडीसह तीन गाड्यांना धडक बसली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
या घटनेमुळे एसटी बसच्या देखभाल दुरुस्तीसह फिटनेसचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
जीवितहानी टळली..
ही घटना झाली त्यावेळी आगार प्रमुख यांच्या कार्यालयात कामगार पालक दिन बैठक सुरू होती. याचवेळी काही प्रवासी प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. बस सुरु झाल्यानंतर मध्ये वाहने उभे नसते तर ही बस थेट आगार प्रमुख त्यांच्या कार्यालयावर धडकली असती व मोठी दुर्घटना झाली असती.