खाजगी आराम बसच्या स्पर्धेसाठी जळगाव ते पुणे दरम्यान एस.टी. महामंडळाच्याही ‘स्लीपर कोच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:35 PM2018-05-05T12:35:11+5:302018-05-05T12:35:11+5:30
एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांची माहिती
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. ५ - प्रवाशांच्या अडचणी सोडवून त्यांना दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न राज्य परिवहन मंडळाचा असून यासाठी जळगाव ते पुणे व भुसावळ ते पुणे अशा चार स्लीपर कोच एस.टी.बस सेवालवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी पत्रपरिषदेत दिली. दरम्यान, जळगावात बसपोर्टचे काम दुसºया टप्प्यात होणार असून यासाठी १०० कोटी खर्च अपेक्षित आहे, तसा प्रस्ताव देखील पाठविण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले.
देवरे यांच्या दालनात शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद झाली, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले, विभागीय अभियंता आर.व्ही. चव्हाण, कार्यशाळा प्रमुख प्रशांत वास्कर, उपयंत्र अभियंता टी.पी. पाटील, पंकज महाजन, कामगार अधिकारी राहुल शिरसाठ, कर्मचारी वर्ग अधिकारी प्रशांत महाजन, लेखापाल के. आर. बागुल, सुरक्षा अधिकारी दामू धनभाते, दिलीप सपकाळे आदी उपस्थित होते.
स्लीपर कोच ताफ्यात
पुणे येथे जाणाºयांची संख्या जास्त असल्याने खाजगी बस मोठ्या प्रमाणात असल्या तरी एसटी त्या प्रमाणात सुविधा व बस का उपलब्ध करीत नाही? असे विचारले असता देवरे म्हणाले की, जळगाव येथून शिवशाही बससेवा सुरू केल्यानंतर तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे व गुजरातकडे जाणाºयांची संख्या अधिक असून त्या दृष्टीने स्लीपर कोच संदर्भात प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे आता शिवशाही पाठोपाठ स्लीपर कोच बसही एसटीच्या ताफ्यात दाखल होतील व पुणे येथे जाण्यासाठी जळगाव व भुसावळ येथून लवकरच प्रत्येकी दोन बस सुरू करणार आहे.
सोमवारपासून गणवेश वाटप
कर्मचाºयांचे गणवेश आले असताना ते का वाटप होत नाही, या प्रश्नावर देवरे म्हणाले की, सोमवारपासून नवीन गणवेश वाटपास सुरुवात करण्यात येईल.
पुण्याच्या धर्तीवर बसपोर्ट व मॉल उभारणार
राज्यात १३ ठिकाणी बसपोर्ट मंजूर असून पहिल्या टप्यात ज्यांनी निविदा दाखल केल्या त्या रखडल्या आहेत. जळगाव येथे दुसºया टप्प्यात बसपोर्टचे काम होणार असून यासाठी १०० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. या अंतर्गत पुण्यात तयार करण्यात आलेल्या बस पोर्टप्रमाणे बस पोर्ट व मॉल उभारण्यात येईल. यासोबतच बस स्थानकासमोरील बाजूचे सुशोभिकरण करण्यासह पार्किंगसाठी मागच्या बाजूला जागा देण्यात येईल. कार्यालयाचे व विश्रामखोलींचे काम हाती घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
आगारांसाठी पालक अधिकारी
एस.टी. प्रवाशांना खासगी आराम बसेस्प्रमाणे सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही सुविधा पुरविण्यात अपयशी आहोत; मात्र या पुढे सर्व सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रशत्नशील राहू. प्रवाशांना पाणी, बसेस्सह विविध सुविधा पुरविण्याकरीता सर्व यंत्रणा कामाला लागली आहे़ त्यासाठी प्रत्येक आगारासाठी पालक अधिकाºयांची नेमणूक करणार आहे.
जळगाव पहिल्या पाचमध्ये राहणार; उत्पन्न एक कोटीने वाढले
एस. टी. तोट्यात असल्याचे भासविले जात असते; मात्र तसे नाही. जळगाव विभागाचे उत्पन्न एका महिन्यात एक कोटीने वाढले असून राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. यापुढेही पहिल्या पाचमध्ये राहण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले.
रिक्त जागा
ज्या मार्गावर गर्दी असते तेथे बस वाढविण्याचा मनोदय असून रिक्त जागांमुळे बसेस् उभ्या असतात, असेही देवरे म्हणाले. चालक व वाहकांच्या या जागा भरण्याचा प्रयत्न असून दर्जेदार सुविधांवर भर दिला जाणार आहे.
बस स्थानकाचे प्रवेशद्वार, सुरक्षा, स्वच्छता इत्यादी विषयावरही त्यांनी यावेळी माहिती दिली. चौकशी व उद््घोषणा कक्षात एक सहाय्यक नियुक्त केला जाईल, जेणे करून प्रवाशांना माहिती मिळण्यास मदत होऊन संवादही साधता येईल, असेही देवरे म्हणाले.