एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 03:01 PM2022-02-02T15:01:57+5:302022-02-02T15:07:32+5:30

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे.

ST workers strike continues; Employee started sugarcane juice center for subsistence! | एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, पगार बंद; उदरनिर्वाहासाठी वाहकानं सुरू केली रसवंती!

googlenewsNext

प्रशांत भदाणे -
​​​​​​​

जळगाव- एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं, या मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या 3 महिन्यांपासून संपावर आहेत. संप मिटावा म्हणून राज्य सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकमत होत नसल्यानं संप चिघळला आहे. यामुळे पगाराअभावी एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत राज्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली, तर काही कर्मचाऱ्यांनी उदरनिर्वाहासाठी पर्यायी मार्ग निवडला आहे. पाहुयात अशाच एका एसटी कर्मचाऱ्याची व्यथा, उदरनिर्वाहासाठी हा कर्मचारी करत असलेली धडपड पाहून तुमचेही डोळे पाणावतील...

ऐन थंडीच्या दिवसांत रस्त्याच्या कडेला असलेली ही रसवंती पाहून तुम्हाला वाटेल की उन्हाळा सुरू झालाय. पण नाही, ही रसवंती उन्हाळ्यासाठी नाही तर गरजेपोटी सुरू झाली आहे. ही रसवंती चालवणारी व्यक्ती एसटी महामंडळात वाहक म्हणून कार्यरत आहे. प्रवीण चौधरी असं या वाहकाचं नाव. एसटीच्या संपामुळं उपासमारीची वेळ आल्यानं प्रवीण यांनी मित्रांकडून उसने पैसे घेऊन रसवंती सुरू केली आहे. हाताला ऊस काढण्याची सवय नाही, पण परिस्थितीनं त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. आधीच कोरोनामुळं वेळेवर पगार होत नसल्यानं एसटी कर्मचारी अडचणीत होते. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं संप चिघळला. अशा परिस्थितीत घर चालवणं कर्मचाऱ्यांना कठीण झालंय. प्रवीण यांच्यावर म्हातारे आई-वडील, पत्नी आणि दोन लहान मुलांची जबाबदारी आहे. तीन महिन्यांपासून पगार नसल्यानं त्यांनी अखेर व्याजाने पैसे घेऊन रसवंती सुरू केली.

प्रवीण चौधरी मूळचे जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावचे रहिवासी आहेत. ते 2009 मध्ये एसटी महामंडळाच्या पालघर विभागात वाहक म्हणून नोकरीला आहेत. यानंतर त्यांनी भिवंडी येथे सेवा बजावली. सध्या ते धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा आगारात सेवेत आहेत. 12 ते 13 वर्षे सेवा झाली असली तरी त्यांच्या हातात अवघा 8 ते 9 हजार रुपये पगार येतो. एवढ्या कमी पगारदार घर चालवताना खूप कसरत होते. आता परिवहन मंत्री म्हणतात की एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ दिली. पण प्रत्यक्षात ही पगारवाढ 21 ते 22 टक्केच असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे. ही पगारवाढ घेऊनही फायदा नाही, असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे.



 

बिकट परिस्थितीमुळं आजपर्यंत 85 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलीये. सरकारने मागण्या अशाच दुर्लक्षित केल्या तर विपरीत घडू शकतं. असं होऊ नये म्हणून सरकारनं एसटीचं विलिनीकरण करावं, अशी आग्रही मागणी प्रवीण चौधरींनी यावेळी केली.

अशा बिकट परिस्थितीला सामोरे जाणारे प्रवीण हे राज्यात एकटे नाहीत, असे हजारो प्रवीण आज उदरनिर्वाहासाठी डोक्याला हात लावून बसलेत. त्यांच्या मागण्यांकडे मायबाप सरकार आतातरी लक्ष देईल का? हा खरा प्रश्न आहे.

Web Title: ST workers strike continues; Employee started sugarcane juice center for subsistence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.