बाहेर फिरणाऱ्यांना भर रस्त्यावर उठबशा आणि दंडुक्याची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:23 PM2020-03-25T12:23:10+5:302020-03-25T12:23:26+5:30
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अतिशय तळमळीने जीवाचे रान करीत असताना नागरिक मात्र, हा विषय हसण्यावर नेत असल्याचे ...
जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अतिशय तळमळीने जीवाचे रान करीत असताना नागरिक मात्र, हा विषय हसण्यावर नेत असल्याचे चित्र सलग दुसºया दिवशी शहरात बघायला मिळाले. शहरात प्रवेश करणारे मार्ग तसेच मुख्य बाजारपेठेत सांगूनही न ऐकणाऱ्यांवर पोलिसांना दंडुका चालवावा लागला तसेच अनेकांना भर रस्त्यावर उठबशा काढण्याची शिक्षा पोलिसांनी केली. शहरात अनेक ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे इटली, फ्रान्ससारख्या देशात लॉकडाऊन असतानाही हजारो जणांना कोरोनाची लागण झाली तर शेकडो जणांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनचे महत्त्वच या देशांना समजले नाही, त्यामुळे आम्ही जी चूक केली, ती भारताने करु नये असे आवाहन परिणाम भोगणाºया देशांकडून केले जात असतानाही जळगावकर मात्र हे आवाहन व सरकारचा आदेश झुगारुन रस्त्यावर उतरत आहे. एकंदरीतच आम्हाला या कोरोनाशी काहीही घेणंदेणं नाही असाच संदेश काही जळगावकरांकडून दिला जात आहे. जे समजदार नागरिक आहेत, त्यांनी घराबाहेर न पडणेच पसंत केले आहे.
दिसला की दे दंडुका
प्रशासकीय संचारबंदी आणि त्याशिवाय जमावबंदी आदेश असल्याने शहरात ठोस कारणाशिवाय फिरणाºया तरुणांना पोलिसांनी दंडुक्याने दणका देत पिटाळून लावले. काही ठिकाणी तर वयस्कर नागरिकही रस्त्यावर दिसले, कारण विचारले तर किराणा व भाजी घेण्यासाठी आल्याचे सांगितले जात होते. एकाच वेळी भाजी घेण्यासाठी मोठी गर्दी उसळत होती. दुसरीकडे ज्यांना या आजाराचे गांभीर्य कळले आहे, ते नागरिक जिल्हा रुग्णालयात नातेवाईक उपचार घेत असतानाही फिरकत नाहीत. एरव्ही नेहमीच गर्दीने गजबजणाºया जिल्हा रुग्णालयात मात्र मंगळवारी शुकशुकाट दिसून आला.
सकाळी गर्दी तर दुपारी शुकशुकाट
गुढीपाडव्याच्या निमित्ताने पिंप्राळा रिक्षा स्टॉप येथे हार-कंगणांची लहान-मोठी दुकाने थाटलेली होती़ त्यामुळे याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी चांगलीच गर्दी झालेली होती़ दुसरीकडे गणेश कॉलनी येथेसुध्दा किराणा दुकान, मेडिकलवरही गर्दी होती़ पेट्रोल पंपांवरही कमी प्रमाणात गर्दी होती़
या भागात चालला जोरदार दंडुका
टॉवर चौक, घाणेकर चौक, सुभाष चौक, सिंधी कॉलनी, कंवर नगर, डी मार्ट, कालिंका माता मंदिर परिसरात विनाकारण दुचाकीने फिरणाºया तरुणांवर पोलिसांनी चांगलाच दंडूका चालविला.पोलिसांकडून पिटाळून लावले जात असल्याची चर्चा शहरात पसरल्यानंतर दुपारी गर्दी कमी झाली होती, मात्र सायंकाळी सात नंतर पुन्हा नागरिक रस्त्यावर उतरले होते.
संचारबंदी झुगारुन येथे तरुणांचा घोळका
गणेश कॉलनीतील प्रभुदेसाई कॉलनी, ख्वॉजामिया व युनिटी चेंबर्स येथील दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरु रहात असून या ठिकाणी विशिष्टच लोकांची गर्दी असते. प्रभुदेसाई कॉलनीतील शांतीबन अपार्टमेंट परिसरात अभियांत्रिकी व वैद्यकिय महाविद्यालयाच्याच विद्यार्थ्यांचा घोळका असतो. या ठिकाणी अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचा संशय या परिसरातील महिलांनी व्यक्त केला आहे. गणेश कॉलनीतही एक स्वीट मार्ट उशिरापर्यंत सुरु होते. ख्वॉजामिया परिसर व युनिटी चेंबर्स येथेही परिस्थिती वेगळी नाही. या विक्रेत्यांकडून संचारबंदी आदेशालाच हरताळ फासली जात आहे.
यंत्रणेचा मनस्ताप अन् व्हायरल मेसेज
कोरोनामुळे संचारबंदी करण्यात आली व नागरिक ही संचारबंदी पाळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर इटली व इतर देशांमध्ये कोरोनाचे काय परिणाम झाले. तेथील नागरिकांनी काय चुका केल्या याचे प्रबोधनात्मक संदेश व्हायरल होत होते. रेल्वे, विमान व बस सेवा बंद करुन सरकार मोठे नुकसान सहन करीत आहेत. भारतीयांच्या जीवापेक्षा हे नुकसान मोठे नाही म्हणत सरकार लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करीत आहेत. घरात थांबले तरी देशसेवाच होईल, असे आवाहन करीत असतानाही नागरिक घराबाहेर पडतच आहेत.