जिल्हा परिषदेची २० जानेवारी रोजी स्थायी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:49 AM2021-01-08T04:49:08+5:302021-01-08T04:49:08+5:30
२५ कोटींच्या निधीतून विकासकामे मार्गी लावण्याची मागणी जळगाव : मनपाच्या २५ कोटींच्या शिल्लक निधीतून शहरातील स्मशानभूमींचे सुशोभिकरण करणे, शिवाजीनगर ...
२५ कोटींच्या निधीतून विकासकामे मार्गी लावण्याची मागणी
जळगाव : मनपाच्या २५ कोटींच्या शिल्लक निधीतून शहरातील स्मशानभूमींचे सुशोभिकरण करणे, शिवाजीनगर उड्डाणपुलावरील अडथळे ठरणारे विद्युत खांब हटविणे, तसेच शहरात काही ठिकाणी नवीन विद्युत खांब व स्ट्रीट लाइट बसविण्याची मागणी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मनपा आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
आरक्षणासाठी तिकीट खिडकीवर गर्दी
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे टप्प्या-टप्पाने सर्व गाड्या सुरू करण्यात येत असल्याने, नागरिकांकडून उन्हाळी सुट्यानिमित्त आतापासून बाहेरगावी जाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. बुधवारी जळगाव स्टेशनवरील आरक्षण तिकीट खिडकीवर सकाळपासूनच नागरिकांची गर्दी होती. लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण करण्यासाठी प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
विशेष गाड्यांनाही तिकीट रद्दचा परतावा देण्याची मागणी
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे सध्या ज्या विशेष उत्सव गाड्या सुरू आहेत. त्या गाड्यांचे तिकीट एखाद्या प्रवाशाने काही कारणात्सव रद्द केल्यानंतर, त्यांना रेल्वेकडून कुठलाही परतावा देण्यात येत नसल्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने विशेष उत्सव रेल्वे गाड्यांनाही तिकीट रद्दचा परतावा देण्याची मागणी प्रवाशांमधून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेसमोर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामामुळे जुन्या जिल्हा परिषदेसमोर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत असून, यामुळे अपघात घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर पुलाचे काम होईपर्यंत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांमधुन होत आहे.