बजरंग बोगदा कामास प्रारंभ
By admin | Published: February 28, 2017 12:08 AM2017-02-28T00:08:36+5:302017-02-28T00:08:36+5:30
जळगाव : बजरंग बोगद्याच्या कामास अखेर रेल्वेच्या मक्तेदाराकडून प्रारंभ झाला आहे.
जळगाव : बजरंग बोगद्याच्या कामास अखेर रेल्वेच्या मक्तेदाराकडून प्रारंभ झाला आहे. त्यात या नवीन बोगदे उभारायच्या परिसरातील ६० मीटर पर्यंतच्या जागेचे जेसीबीच्या सहाय्याने सपाटीकरण करण्याचे काम सोमवारी सुरू झाले. दोन दिवस हे काम चालणार असून त्यानंतर या ठिकाणी श्ोड उभारून मक्तेदाराचे आॅफीस बनवून शेजारी बोगद्यासाठीचे काँक्रीटचे ब्लॉक तयार करण्यात येणार आहेत.
पिंप्राळा रस्त्यावरील बजरंग बोगद्यानजीक २ बोगदे तयार करण्यासाठी मंगळवार, दि.१४ फेब्रुवारी रोजी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त साधत शुभारंभ करण्यात आला. बुधवारपासून या ठिकाणी अडथळा असणारे वृक्ष तोडण्यास प्रारंभ झाला. मात्र बोगद्याच्या प्रत्यक्ष कामास मक्तेदाराने प्रारंभ केलेला नव्हता. त्याची सुरूवात सोमवार, २७ फेब्रुवारीपासून झाली आहे.
९ महिन्यांची मुदत मक्तेदाराला देण्यात आली असली तरी ५ महिन्यात दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण करण्याचा मक्तेदाराचा प्रयत्न राहणार आहे.
६० मीटर परिसरात सपाटीकरण
रेल्वे रुळाखाली बजरंग बोगद्याजवळच दोन बोगदे तयार करण्यात येणार आहे. लांबी ४ मीटर व उंची २.४० मीटर असेल. ‘पुश थ्रु’ पध्दतीने हे काम होईल. नवसाचा गणपती मंदिरापासून तर एस.एम.आय.टी. महाविद्यालयाकडे हा रस्ता जोडला जाणार आहे. या कामासाठी आवश्यक असलेले काँक्रीटचे ब्लॉक या ठिकाणीच तयार केले जाणार आहे. त्यामुळेच प्रत्यक्ष बोगद्याच्या ठिकाणापासून ६० मीटरच्या परिसराचे सपाटीकरण जेसीबीमार्फत करण्यात येत आहे.
शेड, आॅफीसही उभारणार
दोन दिवसात सपाटीकरणाचे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यासाठी जेसीबी व २० कामगार सध्या हे काम करीत आहेत. त्यानंतर या परिसरात शेड उभारून मक्तेदाराचे आॅफीसही या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे.
१ लाख नागरिकांचा प्रश्न मार्गी लागेल
शहरातील रेल्वेमार्गावर असलेला बजरंग बोगदा प्रेम नगर, एसएआयटी कॉलेज, मुक्ताईनगर, पिंप्राळा व महामार्गाशी जोडण्यासाठी महत्वपूर्ण आहे. मात्र तो अरुंद असल्याने व तेथून सांडपाणी व पावसाचे पाणी वाहत असल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत असते.
तसेच पिंप्राळा रेल्वेगेट देखील अनेकदा बंद असते. यामुळे या ठिकाणी देखील वाहतुकीचा खोळंबा होत असतो. मात्र नवीन बोगदे तयार होत असल्याने ही समस्या आता मार्गी लागणार आहे. या बोगद्यांमुळे वाहतुकीची कोंडी दूर होणार असून पिंप्राळा परिसरातील नागरिकांची सोय होणार आहे.