जळगावात समांतर रस्त्यासाठी साखळी उपोषणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 01:11 PM2018-11-15T13:11:50+5:302018-11-15T13:13:54+5:30
डीपीआरची प्रत व निविदा मंजूरीशिवाय आंदोलन मागे ने घेण्याचा निर्धार
जळगाव : शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या समांतर रस्त्याचे काम करण्यात यावे या मागणीसाठी करण्यात येणाºया १०० दिवसांच्या साखळी उपोषणास गुरुवारपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरुवात झाली. या वेळी डीपीआर मंजुरीची प्रत मिळत नाही व कामाची निविदा मंजूर होत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण मागे न घेण्याचा निर्धार समांतर रस्ते कृती समितीच्यावतीने करण्यात आला. १०-१० दिवसांच्या १० टप्प्यात १०० दिवस हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शहरातून जाणाºया महामार्गाच्या समांतर रस्त्याचे काम विविध आंदोलने करूनही मार्गी लागत नसल्याने समांतर रस्ते कृती समितीने १५ नोव्हेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाचा निर्णय घेतला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कांताई सभागृहाच्या परिसरात खुली चर्चा व बैठक आयोजित करण्यात आली होती.
त्यानुसार या उपोषणास सुरुवात झाली. या वेळी उपोषण प्रसंगी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह कृती समितीचे दिलीप तिवारी, डॉ. राधेश्याम चौधरी, माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, नगरसेवक अमर जैन, शिरीश बर्वे, फारुक शेख, अनंत जोशी, गजानन मालपुरे, सुशील नवाल, नितीन रेदसनी, विराज कावडिया, अमित जगताप, आशराफ पिंजारी, मंगला बारी, शोभा चौधरी, सरिता माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी, शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी सुरेशदादा जैन यांनी बोलताना सांगितले की, हा विषय शहरवासीयांचा जिव्हाळ््याचा विषय असून तो तत्काळ मार्गी लागावा. आमदार सुरेश भोळे यांनीही यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगून तीन ते चार दिवसात उपोषण संपेल, असा विश्वास व्यक्त केला.